प्रायोगिक नाटकांचा उत्सव

>> क्षितीज झारापकर 

‘शिकस्त-ए-इश्क’, ‘आणि शेवटी प्रार्थना’ आणि ‘वाय’ अशा तीन प्रायोगिक नाटकांचा उत्सव सध्या प्रायोगिक रंगभूमीवर सुरू आहे. याला भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या पूर्वसंध्येची नांदीच म्हणायला हवी.

प्रत्येक उद्योगात आपल्या उत्पादनाला अधिक चांगलं बनविण्यासाठी प्रयत्न गरजेचा असतो. मोठमोठय़ा कंपन्या यासाठी वारेमाप पैसा खर्च करून रिसर्च आणि डेव्हलपमेंट करतात. या संशोधन प्रक्रियेतून मग त्यांची उत्पादनं सुधारतात आणि ग्राहकांना अधिक संतुष्टी प्राप्त होते. हा सिद्धांत नव्हे तर आजवर पाहिलेली बाब आहे, पण जगात एक असा व्यवसाय आहे ज्यात ही संशोधन प्रक्रिया अत्यल्प खर्चात केली जाते आणि त्याचे परिणाम मात्र फारच महत्त्वाचे आणि दीर्घकाळ टिकणारे असतात. हा व्यवसाय म्हणजे मराठी नाटय़सृष्टी. मराठी नाटय़ व्यवसायाची कार्यशाळा म्हणजे प्रायोगिक रंगभूमी. मराठी रंगभूमीच्या या अत्यंत कार्यशील अशा कोपऱयात आजवर खूप काही महत्त्वाचं आणि मौलिक स्वरूपाचं घडलं. आजही घडतंय. रंगायन, माध्यम, आविष्कार अशा बऱयाच संस्था याच कोपऱयात उभ्या राहिल्या आणि विविध प्रयोगांतून मराठी नाटक अधिक समृद्ध करत राहिल्या. कलंदर रंगकर्मींना एकत्र करून सहकार्य करण्याचं या संस्था एक निमित्त असे, पण मग कालांतराने फेसबुक आणि व्हॉट्स ऍप ही व्यासपीठं त्यासाठी उपलब्ध झाली, पण व्हॉट्स ऍपबद्दल जनमानसात फार काही चांगलं मत नाही. व्हॉट्स ऍपमुळे खूप पंचाईत होऊ लागली. एकतर या व्हॉट्स ऍपवरच्या वांझोटय़ा चर्चांमध्ये माणसांचा खूपसा मौल्यवान कार्यकाल वाया जाऊ लागला. त्यात त्यावर पाणचट, बाष्कळ आणि उत्शृंखल विनोदांची बरसात होऊ लागली. खरं तर इथे आम्हा नाटकवाल्यांचा खरा प्रॉब्लेम झाला. आता आमचे विनोद निप्रभ आणि बोथट वाटू लागले ना! पण याच व्हॉट्स ऍपने गेल्या आठवडय़ात एक वेगळीच किमया करून दाखवली.

काही वर्षांपूर्वी अभिषेक मराठे नावाच्या महाडच्या मुलाने मुंबईत येऊन मराठी नाटक हा एक व्हॉट्स ऍप समूह रचला. त्यात तो त्याच्या सान्निध्यात येणाऱया रंगकर्मींना जोडत असे. असे करता करता मराठी नाटय़सृष्टीतले दिग्गज रंगकर्मीदेखील या समूहात जोडले गेले. यात प्रशांत दामले, पुरुषोतम बेर्डे, अभिराम भडकमकर, डॉ. अनिल बांदिवडेकर, आशीर्वाद मराठे ही काही नावं. या दिग्गजांनी ठरवलं की, प्रायोगिक मराठी रंगभूमीवर कार्य तर खूप होतंय, पण त्या कार्याला व्यासपीठ मिळत नाही. म्हणून या समूहातील चर्चेतून एका प्रायोगिक नाटय़ महोत्सवाची मुहूर्तमेढ झाली. आज येथे आपण या महोत्सवातील सादर झालेल्या तीन नाटकांचा आढावा घेतोय.

शिकस्त-ए–इश्क
हे पनवेलच्या नाटय़ समूहाने सादर केलेलं आणि झी गौरवमध्ये पहिल्या क्रमांकाचं परितोषिक विजेते नाटक. मुसलमान धर्मातल्या विधवेबाबत असणाऱया प्रथांवर भाष्य करणारी ही एक विलक्षण प्रेमकथा आहे. लेखक, दिग्दर्शक सिद्धार्थ साळवी याने हळुवारपणे मांडलेली ही कैफियत. ‘उमराव जान’ चित्रपटातील ‘दिल चीज क्या है’ हे आशाताईंचं गाणं इतकं प्रभावीपणे साळवी याने वापरलंय की, ते त्याला त्या गाण्याच्या गीतकार आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकापेक्षा जास्त कळलंय असं वाटावं. उत्तम अभिनयाने ‘शिकस्त-ए-इश्क’ अक्षरशः नटलंय. नाटकात खूप कलाकार आहेत. प्रायोगिक नाटकांचं हे एक खूप चांगलं असतं. व्यावसायिक नाटकांच्या गणितांसारखं येथे पात्रसंख्या मर्यादित नसते. त्यामुळे नाटक अधिक खुलतं. नेपथ्यही खूप कलात्मक रचलंय. एक वेगळा सुंदर प्रयोग म्हणून हे नाटक रसिकांनी आवर्जून पाहायला हवं. रेश्मा गायकवाड आणि पूजा सिंह निर्मित ‘शिकस्त-ए–इश्क’चा विनामूल्य प्रयोग मुलुंडच्या यंदाच्या नाटय़ संमेलनात होणार आहे.

आणि शेवटी प्रार्थना
हे नाटक नागपूरच्या संचाने सादर केलेलं दोन अंकी नाटक. ‘आणि शेवटी प्रार्थना’ हे राज्य शासनाच्या स्पर्धेत पहिलं आलेलं दोन अंकी नाटक आहे. पहिल्या अंकात एक मुसलमान टांगेवाला अबू आणि इनायत या त्याच्या प्रेयसी-पत्नीची गोष्ट आहे. दुसऱया अंकात एका कलाकाराच्या आंतरिक घुसमटीचा ऊहापोह आहे. दोन्हीत तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. एक समान दुवा इतकाच की, बाह्य कारणांमुळे माणसांची झालेली घुसमट. दिग्दर्शकाने पहिल्या अंकात कथानकावर भर देत दुसऱया अंकात व्हिज्युअलवर फोकस ठेवलाय. कलाकारांचा संच येथे फारच मोठा आहे. या ठिकाणी सर्वांची नावं देणं एकतर शक्य नाही आणि एखाद्याचं नाव घेणं हे संचावर अन्यायकारक असेल. या नाटकातील प्रत्येक कलाकाराने अभिनय शास्त्र्ााबरहुकूम आपलं पात्र पेश केलंय. मंटोच्या कथांचं स्वैर रूपांतर यातून दिसतं. या संचातील 80 टक्के रंगकर्मींची मुंबईला येण्याची ही पहिलीच वेळ होती, पण मराठी नाटय़ क्षेत्राच्या राजधानीत पहिल्यांदाच येऊन या रंगकर्मींनी एक चोख प्रयोग सादर केला.

वाय
महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे निर्मित ‘वाय’ हे दोन अंकी नाटक खरं तर आजच्या सामाजिक आणि राजकीय परीस्थितीवर एक मार्मिक भाष्य आहे. विभावरी देशपांडे आणि रंगा गोडबोले लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक आपल्याला हसवत हसवत आजूबाजूच्या घडामोडींचा आरसा दाखवतं. जुनाट संस्कृतीच्या प्रतिमांमध्ये गुरफटलेल्या तथाकथित संस्कृती रक्षकांकडून पापभिरू पिढीचा कसा गैरवापर करून घेतला जातो हे दाखवण्याचा ‘वाय’चा प्रयत्न आहे. यातले कलाकार हे पुण्यातील मातब्बर रंगकर्मी आहेत. उत्तमरीत्या ते सगळे हे नाटक सादर करतात. लेखक-दिग्दर्शक जोडीने हे नाटक खूपच उपहासात्मक शैलीत बसवलंय आणि त्यामुळे त्याची परिणामकारकता वाढते. तांत्रिकदृष्टय़ा हे सर्वात क्लिष्ट नाटक होतं.

नाटक – शिकस्त-ए-इश्क
लेखक-दिग्दर्शक – सिद्धार्थ साळवी
निर्मात्या – रेश्मा गायकवाड, पूजा सिंह
दर्जा- अडीच स्टार

नाटक – आणि शेवटी प्रार्थना
निर्मिती – राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्था आणि मेराकी थिएटर, नागपूर
कथा – सादत हसन मंटो आणि ख्वाजा अहमद अब्बास
नाटय़ रूपांतर आणि दिग्दर्शन – रूपेश पवार
दर्जा- अडीच स्टार

नाटक – वाय
लेखक/दिग्दर्शक – विभावरी देशपांडे, रंगा गोडबोले
निर्मिती – महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे
दर्जा- अडीच स्टार