प्रायोगिकतेचा उत्सव

27

>> क्षितिज झारापकर

‘मिशन 59’, ‘अव्याहत’, ‘खगनिग्रह’. तीन प्रायोगिक नाटकं सध्या मराठी प्रेक्षकांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. हाडाच्या नाटय़प्रेमींसाठी ही पर्वणीच म्हणायला हवी.

गेल्या वर्षीपासून एका व्हॉटस्ऍप समूहाने एक खूप उत्कृष्ट उपक्रम मराठी नाटय़ क्षेत्रात सुरू केलेला आहे. तीन प्रायोगिक नाटकांचा महोत्सव असा हा उपक्रम आहे. मुख्य म्हणजे या महोत्सवाचे आयोजक आहेत प्रशांत दामले, चंद्रकांत कुलकर्णी, पुरुषोत्तम बेर्डे, अभिराम भडकमकर आदी तद्दन व्यावसायिक रंगकर्मी. या महोत्सवाच्या निमित्ताने एका दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेत पहिली आलेली प्रायोगिक नाटकं मुंबईत शिवाजी मंदिर येथे पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट शिवाजी मंदिर उपलब्ध करून देतं आणि स्टेट बँकसारखे प्रायोजक हा महोत्सव रसिकांना निव्वळ शंभर रुपयांत शक्य करून देतात. आज आपण या तीनही नाटकांकडे पाहणार आहोत.

मिशन 59

‘‘हाऊ इज द जोश!’’ या घोषणेवर एका पक्षाने देशाची निवडणूक जिंकली आणि ‘मिशन 59’ं या नाटकाने कामगार कल्याण केंद्राची स्पर्धा. ‘मिशन 59’ अगदी पहिल्या क्षणापासून पेक्षकांना सतत हिंदुस्थानी सैन्य आणि सेनेच्या शौर्याबाबत ठसवत राहतं. कश्मीरच्या खोऱयातील एका दुर्गम ठिकाणी एका अतिरेक्याला सेना पकडते आणि तो आर्मीचा मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्याचं कथानक म्हणजे ‘मिशन 59’. लेखक प्रकाश माजलकर यांनी लेखनात नाटक अत्यंत सोपं ठेवलंय. कथेप्रमाणे येणारी वळणं व्यवस्थित अधोरेखित करत माजलकरांनी नाटक सरकतं ठेवण्याचा प्रयत्न केलाय. काही ठिकाणी मात्र उगीच पुनरावृत्ती आहेत, ज्या टाळता आल्या असत्या. दिग्दर्शक तुषार घरत यांनी प्रायोगिकतेचा बुरखा न पांघरता नाटक उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला वापरलेल्या क्लृप्त्या तर व्यावसायिक नाटकांना लाजवतील अशा बेतल्या आहेत. ‘मिशन 59’ हे संघनाटय़ आहे. कलाकारांचा संच मोठा आहे. ‘मिशन 59’ मधल्या सर्व कलाकारांनी नेमक्या भूमिका वठवल्या आहेत. माझगाव डॉक कलाकार मंडळी यांचं ‘मिशन 59’ हे सैन्य आणि शौर्य याची गाथा घेऊन आपल्या समोर उभं राहतं.

 नाटक – मिशन 59  निर्मिती – माझगाव डॉक मंडळी  निर्माते – अमित घरत  लेखक – प्रकाश माजलकर  प्रकाश – राजेश शिंदे  संगीत – स्वप्नील घरत  नेपथ्य- नितीन महाडिक  दिग्दर्शक – तुषार घरत  कलाकार – प्रियंका कासले, उदय पाटकर, सार्थक सोनवले, तुषार घरत दर्जा – अव्याहत

अव्याहत :

गोव्याच्या रंगकर्मींनी या महोत्सवात ‘अव्याहत’ हे एक अप्रतिम नाटक सादर केलं. नाटकाची मांडणी ही बौद्ध भिक्षू, त्यांची तत्कालीन धर्मपीठं, मगध सम्राट आणि रयतेतील आदिवासी अशा पात्रांतून बुद्धचरित्राच्या संघर्षाच्या कथेची आहे. एका ज्ञानी व्यासंगी भिक्षूला मगध सम्राट बुद्धचरित्र लिहायला सांगतात, पण धर्मपीठं त्याला विरोध करतं असा काहीसा घाट ‘अव्याहत’चा आहे. लिखाणात खूपच उच्च दर्जाचं ‘अव्याहत’ दिग्दर्शनात त्याहीपेक्षा वरची पातळी गाठत जातं. पाटलीपुत्र आणि कलिंगाच्या काळातलं कथानक जरी असलं तरी नाटक आजच्या सामाजिक परिस्थितीशी तंतोतंत जुळत.ं बुद्ध सामान्य होते, पण मठाधिपती बुद्धाला चरित्रातून देव बनवून अतिसामान्य करून टाकतील हा आक्रोश खूपच रेलेव्हन्ट आहे. ‘अव्याहत’ं मुक्त नाटय़ाच्या फॉर्ममध्ये सादर होत असल्याने नेपथ्याचा प्रश्न येत नाही तरी सूचकतेतून स्थळं उत्तम उभी राहतात, पण ‘अव्याहत’ चा सर्वात स्ट्राँग पॉइण्ट आहे तो नाटकाची प्रकाश योजना. रंगमंचीय दिव्यातून ‘अव्याहत’ने घडवलेली जादू कमाल आहे. ज्यात सगळ्या कलाकारांनी टेक्स्टबुक अभिनयाचा आविष्कार घडवलाय. सगळ्याचा परिपाक म्हणजे गोव्याच्या दारूसारखं ‘अव्याहत’ं हळूहळू आपल्यावर चढत जातं.

 नाटक – अव्याहत  नाटय़कर्मी – प्राजक्ता कावळेकर, अपूर्वा तिवरेकर,

बिपीन मंगेशकर, कौस्तुभ नाईक  दर्जा –

खगनिग्रह
मध्यम कला मंच आणि अभिषेक कला मंच यांचं ‘खगनिग्रह’ हे इथलं तिसरं नाटक.‘खगनिग्रह’ हे प्रायोगिक महोत्सवातील ऍब्स्टॅक्ट फॉर्मचं नाटक. डॉ. अनिल बांदिवडेकर हे लेखक आणि दिग्दर्शक. मुळात बांदिवडेकर हे एक खूप संवेदनशील रंगकर्मी आहेत. ‘खगनिग्रह’मध्ये त्यांनी जगण्याची म्हणा की जगाची म्हणा, गरज आणि ती पुरवण्याचा शोध याचं गमक मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. आता ही गरज अणि शोध प्रक्रिया ही प्रत्येकाची वेगळी असते आणि म्हणूनच ‘खगनिग्रह’ ं हे नाटक प्रत्येक प्रेक्षकांसाठी वेगळं आहे. ‘खगनिग्रह’ डान्सिकल, म्युझिकल फॉर्म मध्ये घडतं. त्यामुळे नृत्य दिग्दर्शिका स्मृती तळपदे या खूप महत्त्वाच्या ठरतात. यातल्या प्रत्येक प्रवेशाला लय अणि ताल आहे आणि स्मृती तळपदेंनी सुंदर साधलेला आहे. ‘खगनिग्रह’चं दृष्यात्मक रूपदेखील अतिशय प्रेक्षणीय आहे. शीतल तळपदेंनी ही बाजू खूपच भक्कम केलेली आहे. पुन्हा सांघिक नाटक आहे, ज्यात कलाकारांनी कुठेही बाज ढळू न देता नाटय़ साधलंय. ‘खगनिग्रहं’ हे खऱया अर्थाने महोत्सवातलं प्रायोगिक नाटक होतं.

 नाटक – खगनिग्रह  निर्मिती – अभिषेक आणि माध्यम कलामंच  निर्मिती सहाय्य – रजन आवळेगावकर  नृत्य – स्मृती तळपदे  प्रकाश – शितल तळपदे  नेपथ्य – समीर नाडकर्णी, रत्नाकर वर्दे  संगीत – मयुरेश माडगावकर  लेखन, दिग्दर्शन – डॉ. अनिल बांदिवडेकर  कलाकार – हिमांगी शुक्ल, नेहा दाणी, अभिजित धोत्रे, योगेश कुमावत.  दर्जा –

आशीर्वाद मराठी अणि आभास आनंद यांच्या व्हॉटसऍप ग्रुपचा हा उपक्रम स्तुत्य आहे आणि येणाऱया वर्षात ही नाटय़ पर्वणी अविरत सुरू राहो ही सदिच्छा!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या