डब्बल मनोरंजन

525

>> क्षितिज झारापकर

‘सदा सर्वदा’ आणि ‘अगं ऐकलंस का?’ सध्या मोसम छान छान नाटकांचा आहे. त्यामुळे परीक्षणातही डब्बल धमाका.

गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनंतरचा मौसम हा नाटय़सृष्टीसाठी एक महत्त्वाचा हंगाम झाला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांत उर्वरित वर्षभरात आली नसतील तितकी नाटकं अचानक रंगभूमीवर अवतरतात. नाटय़कर्मी आता या तीन महिन्यांची वाट बघत थांबतात. आपलं नाटक याच हंगामात यावं यासाठी सगळी तयारी करतात. मग मर्यादित नाटय़गृह असलेल्या मराठी रंगभूमीवर प्रयोगांची तारांबळ उडते. त्यात पुन्हा या तिमाहीत फक्त बारा शनिवार-रविवार. सगळ्यांची इच्छा आपल्याला त्याच तारखा मिळाव्यात. या सगळ्याला कारण म्हणजे मराठी कलाक्षेत्रातले सन्मान आणि गौरव. सगळे पुरस्कार सोहळे हे 31 डिसेंबरपर्यंत रुजू होणाऱया नाटकांसाठी असतात. हे सोहळे साधारणपणे जानेवारी अखेरपासून फेब्रुवारी अखेरीपर्यंत संपन्न होतात. म्हणजे वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत नाटक सुरू केलं की ते फार तर पाच महिने चालवावं लागतं. मग प्रेक्षकांनी प्रतिसाद नाही दिला आणि तिकीट बारीवर नाटक फसलं तर या सोहळ्यांमध्ये हजेरी लावून नाटक बंद करता येतं. पण मोठय़ा संख्येने नाटकं एकत्र अवतरली की मग त्यांची सगळ्यांची दखल घेताना आमची धवपळ होते. म्हणून आज आपण दोन नाटकांची पडताळणी करणार आहोत.

सदा सर्वदा
हे नाटक पुनरुज्जीवित आहे. जनार्दन लवंगारे यांनी ते काही वर्षांपूर्वी केलं होतं. लवंगारेंनीच तर पुन्हा एकदा आणलंय. महाभारतातल्या सुभद्रा, अर्जुन, कृष्ण, बलराम आणि दुर्योधन यांच्यातली सुभद्रेच्या लग्नाच्या वेळची गंमत हा या नाटकाचा गाभा आहे. जनार्दन लवंगारे यांचं लिखाण हे नेहमीच खमंग आणि लज्जतदार असतं. ‘सदा सर्वदा’मध्ये पुन्हा याचा प्रत्यय येतो. त्यांचं नाटक इतकं लवचीक असतं की नाटकातले संदर्भ बदलत नवीन राजकीय अणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे पंच तयार करून लवंगारे नाटक पुढे सरकवतात. म्हणूनच ‘सदा सर्वदा’ आजही तितकंच मनोरंजक आहे जितकं ते पहिल्यांदा सादर झालं तेव्हा होतं. लवंगारेंच्या नाटकात त्यांचे सहकलाकार तितकेच महत्त्वाचे असतात. एका विशिष्ट पठडीचे कलाकार लागतात.

‘सदा सर्वदा’चे सर्व कलाकार मातब्बर आहेत.
प्रेमात पडलेल्या अर्जुनाच्या भूमिकेत सुचित जाधव मजा करतो. व्याकूळ तरीही अग्रगण्य पांडव हा बॅलन्स सुचितने व्यवस्थित सांभाळला आहे. बलराम झालेले प्रदीप पटर्वधन केवळ आपल्या रिऍक्शन्सने कमाल करून जातात. नेमक्या ठिकाणी तोंडात बोटं घालून शिट्टय़ा मारत ते हंशा वसूल करतात. प्रदीपचा ‘टुरटूर’ आणि ‘मोरूची मावशी’पासूनचा तगडा अनुभव ‘सदा सर्वदा’ची रंगत वाढवण्यात कामी येतो. बलरामने सुभद्रेचं लग्न ज्याच्याशी ठरवलंय तो दुर्योधन संजय कसबेकर यांनी कमालीचा इंटरेस्टिंग आणि मनोरंजक केलाय. एका टग्या – भाईच्या आवेषात संजयने दुर्योधन साकारलाय. संजयचा हॅण्डबिलं वाटत फिरणारा दुर्योधन भावतो. ‘सदा सर्वदा’ची यूएसपी आहे ती अवखळ सुभद्रा. इथे नूतन जयंत या अभिनेत्रीने धम्माल केली आहे. त्या अर्जुनाशी त्याच्या बाजात, दुर्योधनाशी भाईगिरीच्या थाटात, सुदामाशी थोडा आब राखून आणि बलरामची बहीण असल्यामुळे तोंडात बोट घालून शिट्टय़ा मारण्यापर्यंत सगळं करतात. नूतन जयंत ही एक हरहुन्नरी गुणी कलावंत आहे हे या नाटकात दिसतं. ‘सदा सर्वदा’ची ही अफलातून मोट खऱया अर्थाने सांभाळली आहे ती सुदामाच्या सूत्रधारसदृश्य भूमिकेतून स्वतः जनार्दन लवंगारे यांनी. ठसठशीत नसलेलं हे पात्र लवंगारे केवळ त्यांच्या तिथे असण्याने ठाशीव करून टाकतात.

चंद्रकला या त्यांच्याच संस्थेतर्फे लवंगारे यांनी ‘सदा सर्वदा’ आणलंय. हे निर्माता म्हणून माझं शेवटचं नाटक असं ते म्हणाले. निखळ करमणुकीची नाटकं करणाऱया या मनस्वी रंगकर्मीने आपल्या या निणर्याचा फेरविचार करावा हीच इच्छा.

n नाटक- सदासर्वदा
n निर्मिती – चंद्रकला
n निर्माते – जनार्दन लवंगारे
n नेपथ्य – प्रवीण गवळी
n लेखक/दिग्दर्शक – जनार्दन लवंगारे
n कलाकार – नूतन जयंत, तेजश्री मेहेर, शिवाजी राजेश, सुचित जाधव, उमेश ठाकूर, संजय कसबेकर, जनार्दन लवंगारे, प्रदीप पटवर्धन

दर्जा – तीन स्टार

अगं ऐकलंस का?
ओम या दिग्दर्शकाचं नवीन नाटक म्हणजे ‘अगं ऐकलंस का?’. हे नाटक विनायक कावळे आणि गौरी लवाटे यांनी लिहिलंय. नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यात येणाऱया आत्यास्वरूपी कलहाची ही कहाणी. ‘अगं ऐकलंस का?’ हे नाटक विनोदी असलं तरी नाटकातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न आहे. नाटकाची मोट बांधताना निर्माते शशिकांत जाधव, कल्याण मराठे, आशीष लवाटे आणि मनोज पाटील यांनी जुन्या नव्याचा एक विलक्षण संगम साधलाय. ओमने दिग्दर्शनात नाटकाची दृष्यात्मकता जपलीये. प्रत्येक प्रवेशात कॉम्पोझिशन्स उत्तम वापरल्या आहेत. त्यामुळे नाटक पाहण्याचा एक वेगळा आनंद मिळतो. लिखाणात नाटक छान बेतलं गेलं आहे. नाटकाला आवश्यक नाटय़मयता आणि विनोद याची व्यवस्थित सांगड घातली गेली आहे.

कलाकारांमध्येही ‘अगं ऐकलंस का?’मध्ये नावीन्य आहे. नाटकाची लीड पेअर आशुतोष कुलकर्णी आणि गीतांजली गणगे या दोघांचं हे पहिलं नाटक. दोघांनी उत्तम अभिनय करून कार्य सिद्धीस नेलं आहे. आशुतोषने नवऱयाची घालमेल सहजतेने दर्शवली आहे. त्याच्याकडे विनोदाचं टायमिंगदेखिल उत्तम आहे हे आशुतोषने ‘अगं ऐकलंस का?’मध्ये ठिकठिकाणी दाखवलंय. गीतांजलीने नव्या नवरीची घुसमट प्रभावीपणे साकारली आहे. पहिलंच नाटक असूनही तिने व्यावसायिक दर्जाचा परफॉर्मन्स दिला आहे. सोनाली मगरने मैत्रीण मस्त वठवली आहे. माकड या नाटकातून लक्षवेधी ठरलेली ही अभिनेत्री इथे मज्जा करताना दिसते. चित्रा कुलकर्णी यांनी सासू ठाशीव केली आहे. सुदेश म्हशीलकर हे या सगळ्या नवोदितांच्या मागे आपल्या अनुभवाचा पोक्तपणा घेऊन खंबीरपणे उभे राहतात. कमालीच्या सहजतेने म्हशीलकर ‘अगं ऐकलंस का?’मध्ये वावरतात आणि नाटक धरून ठेवतात. सिद्धरुपा करमरकर नाटकाचा केंद्रबिंदू ठरतात. आत्याच्या भूमिकेत त्या काकांच्या फोटोसकट धमाल करतात. मुळात सिद्धरुपाला अशा भूमिकेत आपण पाहिलेलं नाही. त्यामुळे हे एक सरप्राईज ठरतं. साई-पीयुषचं संगीत आणि एक गीत मस्त. मोरया एलिट एण्टरटेन्मेंट आणि व्ही. आर. प्रॉडक्शन्स निर्मित ‘अगं ऐकलंस का?’ एक छान गोडसर नाटक आहे.

n नाटक- अगं ऐकलंस का?
n निर्माते – शशिकांत जाधव,कुणाल मराठे, आशीष लवाटे, मनोज पाटील
n लेखक – विनायक कावळे, गौरी लवाटे
n संगीत – साई पीयुष
n नेपथ्य, दिग्दर्शन – ओम
n कलाकार -गीतांजली गणगे, सोनाली मगर, चित्रा कुलकर्णी, सिद्धिरूपा करमरकर, सुदेश म्हशीलकर, आशुतोष कुलकर्णी
दर्जा – अडीच स्टार

आपली प्रतिक्रिया द्या