ये रे ये रे पैसा – 2:  हलकीफुलकी रंगतदार करमणूक

2713

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

मराठीतल्या चांगल्या आणि नावाजलेल्या कलाकारांची फौज, फुटकळ असले तरीही त्याक्षणी हसवतील असे विनोद मराठमोळ्या सिनेमात बर्‍यापैकी अनुभवायला मिळणारं लंडन, सस्पेन्स, गाणी, गोंधळ एकूणच टाइमपास योग्यतेचा मसाला खच्चून भरलेला ‘ये रे ये रे पैसा २’ हा सिनेमा टाइमपास या शब्दासमोर नक्कीच फीट बसतो.

बँकेचे दहा हजार करोड इतके रुपये घेऊन पळलेल्या नीरज शहाला मुंबईला पकडून आणण्याची जबाबदारी अण्णा या वसुली एजंटवर येते. तो त्यासाठी स्वत:ची टीम निवडतो आणि त्याला पकडून आणण्यासाठी लंडनला येतो. पण तिथे नीरज सापडतो का की नवीनच काही समोर वाढून ठेवलं असतं. पैशांचा गोंधळ नक्की काय असतो. मिशन यशस्वी होते का? या सगळ्याचा विनोदी गडबड गुंता म्हणजे ‘ये रे ये रे पैसा २’ हा सिनेमा. गेल्या वर्षी ‘ये रे ये रे पैसा’ हा सिनेमा प्रर्दिशत झाला होता. त्याचाच हा पुढचा भाग. खरं तर हा त्याचाच भाग असला तरी कथा पूर्णपणे वेगळी आहे. जरी मुख्य व्यक्तिरेखा त्याच असल्या तरीही सिनेमाचं कथानक मात्र पूर्ण वेगळं आणि नव्या व्यक्तिरेखा घेऊन पूर्ण नव्या पद्धतीने मांडले आहे. त्यामुळे पहिला सिनेमा पाहिला असला त्याची सुरुवातीला जरी आठवण झाली तरी सिनेमाच्या पाचव्या मिनिटांत आपण तो विसरून जातो आणि जर पाहिलाच नसेल तर हा भाग दोन असूनही काही फरक पडत नाही.

मुळात या सिनेमाची काही विचार करायला लावणारं देण्याची किंचितही अपेक्षा नाही. निव्वळ करमणूक एवढंच या सिनेमाचं उद्दिष्ट आहे. सिनेमाची झलक बघूनही ते लक्षात येतं आणि त्याप्रमाणे हा सिनेमा करमणुकीशी प्रामाणिक राहिला आहे असं नक्कीच म्हणता येईल. यात अनेक ठिकाणी अतिशयोक्ती आहे, र्तािकक बाजू तर कित्येक दृश्यांमध्ये गुंडाळून ठेवली आहे. शिवाय उगाच शाब्दिक निर्बुद्ध विनोद वगैरेदेखील आहेत. पण तरीही हा सिनेमा कुठेही उगाच कंटाळा न आणता करमणूक करतो आणि अशा सिनेमातून तेवढीच तर अपेक्षा असते. किंबहुना पहिला भाग बघितल्यानंतर दुसरा भाग काय वाट्याला येईल अशी धास्ती होती. पण जर तुलनाच करायची झाली तर हा दुसरा भाग पहिल्यापेक्षा किती तरी अधिक सहज आणि करमणूक प्रधान झाला आहे.

या सिनेमामध्ये मराठीतली अनेक मोठी, प्रसिद्ध आणि प्रेक्षकांना आवडतील अशी नावं आहेत. विशेष म्हणजे या सगळ्यांनी आपापल्या भूमिकेला बर्‍यापैकी न्याय दिला आहे. विनोदी सिनेमा असल्याने प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आलेली व्यक्तिरेखा मोकळेपणानं साकारली आहे. संजय नार्वेकर, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी या मागच्या सिनेमातून या सिनेमात गोष्ट पुढे नेणार्‍या मुख्य कलाकारांसोबत पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओकसारखे मराठीमधील आवडती जोडी, शिवाय अनिकेत विश्वासराव, मृण्मयी गोडबोले, प्रियदर्शन जाधव, स्मिता गोंदकर अशी वेगळी नावं. यामुळे सिनेमाला एक छान ग्लॅमरस वलय आलं आहे. हे सगळं लंडनला चित्रित करतानादेखील बर्‍यापैकी केलं गेलं आहे. त्यामुळे एकूणच सिनेमाच्या बांधणीमध्ये बॉलीवूडच्या तोडीचा भारदस्तपणा जाणवतो.

मुळात या सिनेमाला एक ठरावीक पॅटर्न आहे. हिंदीत आपण अनेकदा तो पॅटर्न बघतो. एक चोर त्याने केलेली चोरी अवलिया मित्रांचा कंपू आणि मग चोरी पकडताना उडणारी गडबड गोंधळ. साधारण त्याच पॅटर्नमधला हा सिनेमा आहे. पण तरीही या सिनेमाला एक विशिष्ट गोष्ट आहे. त्या गोष्टीची बर्‍यापैकी सुसूत्र बांधणी आहे आणि छोटे छोटे पण हसू आणतील असे प्रासंगिक किंवा शाब्दिक विनोद आहेत आणि हे सगळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांची पकड घेतं.

अशा सिनेमांमध्ये अतिशयोक्ती टाळता येत नसली तरीही त्याचा प्रमाणित वापर नक्कीच करमणूक करण्यात यशस्वी होतो. या सिनेमातही त्याचा अनुभव येतो. ‘अश्विनी ये ना’ किंवा नंतरचं मराठी भाषेला विविध भाषांच्या स्टाईलमध्ये रचून केलेलं गाणं छान झालंय. त्याच्या वरची नृत्य रचनाही छान आहे. एकूण लेखनासोबत हेमंत ढोमेची दिग्दर्शन शैली आणि त्याला असणारी विनोदाच्या नेमक्या बाजाची असलेली जाण या सिनेमातून पुन्हा एकदा दिसून येते.

आता चोरांना पकडायला जी टीम निवडली जाते ती नक्की कसे ऑपरेशन करते. जरी माहिती मिळवत असले तरीही ते कसे मिळवतात हे उलगडत नाही. नुसतं थेट गोष्टी घडताना दिसतात. किंवा त्या फसवणूक करणार्‍या चोरासोबत जी राहत असते ती का राहत असते. अशा अनेक गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत. त्यातला गुंता सोडवताना पडद्यावर दिसल्या असत्या तर कदाचित रंगत वाढली असती. पण तरीही करमणूक करण्यात मात्र हा सिनेमा सर्वच अंगाने यशस्वी होतो हे नक्की. मुळात फार विचार न करता डोकं बाजूला ठेवून दोन सव्वादोन तास एन्जॉय करायचं असेल तर हा सिनेमा नक्कीच चांगला पर्याय ठरू शकतो.

सिनेमा             ये रे ये रे पैसा २

दर्जा                  ***

निर्माता             राजेश बांग्रा, निनाद बत्तीन, ओमप्रकाश भट्ट,  स्वाती खोपकर, कुमार मंगत

दिग्दर्शक            हेमंत ढोमे

लेखक                हृषिकेश कोळी

संगीत                ट्रॉय आरिफ, मेघदीप बोस

कलाकार      संजय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव,                             प्रसाद ओक, मृण्मयी गोडबोले, स्मिता गोंदकर, मृणाल कुलकर्णी

आपली प्रतिक्रिया द्या