हाऊसफुल्ल : करमणुकीची हवा नसलेला फुगा ‘माझा अगडबम’

222

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

फुगा  कितीही फुगवला तरी त्यालाही मर्यादा असतेच की! अति हवा भरली की, तो फुटतोच. याचंच उदाहरण म्हणजे ‘माझा अगडबम’ हा सिनेमा. जाडेपणा आणि विनोद हे कॉम्बिनेशन हमखास हशा आणि टाळ्या वसूल करणारं असतं हे आपल्या सिनेमांनी आपल्याला शिकवलंय. म्हणून त्या जाडेपणाला फुगव फुगव फुगवलं की, आणखी टाळ्या आणि हशा वसूल करता येईल. बाकी कथा, दिग्दर्शन वगैरे काय नगण्य गोष्टी असतात असा विचार करून हा सिनेमा केला गेला असावा असं तो पाहताना राहून राहून वाटतं, पण त्यामुळे प्रेक्षकाची हवा मात्र अति कंटाळ्याची सुई लागून हवा गेल्यासारखीच होते.

‘माझा अगडबम’ या सिनेमाला मुळात काही तर्क नाही. बरं, निव्वळ विनोदी सिनेमा आहे, त्याला तर्क कशाला हवा. नुसतं हसायचं, पॉपकॉर्न खायचे आणि गप्प बसायचं असं जरी असलं तरी निदान समोर जे दिसतंय, ते डोकं बाजूला ठेवून किमान हसू आणणारं तरी हवं, पण मुळात हा सिनेमा पाहताना आपण इथे का आलोय आणि कधी हा गोंधळ संपणार आहे इतकाच विचार मनात येतो.

ही कथा एका प्रचंड जाड्या बाईची आहे. ती जाडी असल्याने समाजात तिला सगळे हसत असतात. तिच्यावर विनोद करत असतात, पण तिचा नवरा तिच्यावर प्रेम करत असतो. तिची सासू, वडील आणि काही जवळच्या लोकांनी तिला स्वीकारलं असतं. तीदेखील आपल्या जाडेपणाबद्दल जवळ जवळ खूश असते. तिचे मल्ल वडील एकदा डब्ल्यूडब्ल्यूएफच्या चॅलेंजमध्ये जखमी होतात आणि वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायला ही नाजुका सज्ज होते, पण कुस्तीपटू नसताना ती हे चॅलेंज कसं स्वीकारते, एका महिलेला यात यायला देतात का, ती नक्की काय करते या सगळ्याची गमतीदार (?) गोष्ट (पुन्हा एकदा?) म्हणजे ‘माझा अगडबम’ हा सिनेमा.

या सिनेमात जरी खूप करमणुकीसारखं काही केलं असलं तरी त्यामुळे जराही करमणूक होत नाही. हसू येत नाही किंवा छान कल्पक काहीतरी बघितल्याचा आनंदही होत नाही.

मुळात जाडेपणा किंवा आणखी काही जे नेहमीपेक्षा वेगळं असतं त्यावर उत्तम सिनेमा बनू शकतो आणि तो आजवर बनला आहे, पण त्यावर ओंगळपणा करून किंवा गोष्टींना हास्यास्पद बनवून नुसतं हसं खेचायचं यात काहीही मोठेपणा नाही. उलट अशाने कल्पनेचा अभावच जास्त दिसून येतो.

या सिनेमाच्या पटकथेत जराही दम नाही. कुस्तीचा फड काय, औषध वडिलांच्या तोंडात घालायला धावणारी नाजुका काय, नाजुका आणि तिच्या नवर्‍यातली प्रेमगीतं किंवा प्रेमप्रसंग ते काय, बाबा कामदेव काय, डब्ल्यूडब्ल्यूएफची स्पर्धा काय, त्यांची ती रंगीबेरंगी गाडी काय किंवा फोटोतल्या सासर्‍यांचे फुटकळ विनोद काय, कशाला काहीच अर्थ नाही. या सगळ्यातून जी प्रासंगिक विनोद निर्मिती करायचा प्रयत्न केलाय त्यामुळे हसू येत नाही, तर ती हास्यास्पद वाटते.

एवढ्या अगडबम बाईचं पाइपवरून खारीसारखं सरसर उतरणं आणि वर चढणं. डब्ल्यूडब्ल्यूएफची मराठी स्पर्धा इत्यादी गोष्टी तर कल्पना करता येणार नाहीत इतक्या हास्यास्पद झाल्या आहेत. बरं, त्यातला जो ड्रीम सिक्वेन्स आहे त्यात ती नाजुका छोटे कपडे घालून किंवा मर्लिन मन्रोसारखी वेशभूषा करून येते ते तर स्वप्न जरी असलं तरी दृष्टीला अत्यंत ओंगळ वाटतं. अभिनयाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ना सुबोध भावे खास वाटत, ना उषा नाडकर्णी ना आणखी कोणी. एक सिनेमा उरकला या आविर्भावात सगळे जण काम करतात आणि जी मुख्य अभिनेत्री तृप्ती भोईर..तिला तर ते ऍस्थेटिक्स आणि मेकअप इतका जड झालाय की, सिनेमात ते सगळं घालून चालणंच काय बोलणंदेखील जमत नाही. संवाद बोलताना मेकअप सांभाळू की संवाद बोलू अशी अवस्था होते. त्यामुळे एकूणच त्या अवताराला दाखवताना अभिनयाचं पान तसंच रिकामं राहतं. कुस्तीच्या फडातला जयवंत वाडकर किंवा डब्ल्यूडब्ल्यूएफची स्पर्धा हे तर उभे राहतच नाहीत. सगळा प्रपंच हा नुसता टोकं जुळवायचा अट्टहास केल्यासारखा वाटत राहतो.

एकूणच सिनेमाच्या कथेत तर जीवच नाही. पटकथा, दिग्दर्शन या गोष्टी जमून आलेल्याच नाहीत. बरेच चांगले कलाकार असूनही अभिनयाची पाटी तशी कोरीच राहिली आहे आणि संवादातला कर्कश्शपणा टाळता येत नाही. एकूणच हा सिनेमा करमणूक करण्यास फोल ठरतो. जाडेपणा कुठच्याही कारणाने असू शकतो, पण याचा अर्थ घरात एखादी जाडी व्यक्ती असेल तर तिला अवाढव्य ग्लास. तिला भलंमोठं ताट असं कधी घडत नाही. जाडा माणूस म्हणजे नुसतं अमाप खाणं पिणं होत नाही या गोष्टीचा विचार करायला हवा होता.

एखाद्या कार्टून फिल्ममध्ये कुठे असतं लॉजिक. असंच काहीही घडतं आणि आपण हसतोच की! असा युक्तिवाद या सिनेमासाठी होऊ शकतो, पण मग तशा अंदाजानेच सिनेमा बनवला असला तर मग तो पाहण्याऐवजी कार्टून बघणं जास्त रास्त ठरलं असतं.

अर्थात मेकअप, ऍस्थेटिक्सवर मेहनत घेतली गेली आहे आणि ते सगळं करून घेण्यात तृप्ती भोईरने धाडसही केलंय हे नक्की, पण या सगळ्या संकल्पनेला कल्पकतेची आणि थोडी सुसूत्रतेची जोड देता आली असती तर कदाचित बेढब व्यक्तिरेखेतून सुबक सिनेमा तरी साकारला गेला असता.

दर्जा : *1/2

सिनेमा : माझा अगडबम

निर्माता तृप्ती भोईर

दिग्दर्शक तृप्ती भोईर

कथा/पटकथा : शेख दाऊद जी.

संवाद : हृषीकेश कोळी

कलाकार : तृप्ती भोईर, सुबोध भावे, उषा नाडकर्णी, जयवंत वाडकर, तानाजी गालगुंडे

आपली प्रतिक्रिया द्या