हाऊसफुल्ल : आपलं घर आणि नात्यातला गुंता : वेलकम होम

117


>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

कुठच्याही  स्त्रीला आपलं स्वतःचं घर असावं असा पडलेला प्रश्न म्हणजे स्त्रीवादी प्रवृत्ती नाही की कुठला क्रांतिकारी विचार नाही. एक साधासहज प्रश्न आहे, ज्याचा कधी कोणी फारसा विचारच केलेला नाही. लग्नाआधीचं घर हे वडिलांचे घर, लग्नानंतरचं घर हे नवऱ्याचं घर, मग पुढे कधी भावाचं घर कधी मुलाचं घर…या सगळ्या घरांमध्ये ती हक्काने, अभिमानाने वावरते, ती तिथे राहते म्हणून सगळी सुखं तिच्या पायाशीही असतात, पण तिला किंवा तिच्या घरच्यांना हे तिचं घर नाही हे मात्र कधी लक्षातच येत नाही. जेव्हा ती माहेरी येते तेव्हा ती पाहुणी असते, सासरी त्यांच्या घरात गेलेली असते… हाच सूक्ष्म भाव टिपणारा, कधी विचारच न केलेल्या गोष्टीवर विचार करायला लावणारा सिनेमा म्हणजे ‘वेलकम होम’.

या सिनेमाचा भाव खूप साधासरळ आहे. त्यात कुठेही अतिरंजित नाटय़ नाही, पण तरीही सिनेमाचं मर्म पाहणाऱ्या प्रत्येकाला थेट भिडतं आणि जाणवतं. या सिनेमाची, किंबहुना हा विचार मांडण्याची नितांत गरज होती.

या सिनेमाची कथा सुरू होते ती एका अस्ताव्यस्त घराच्या देखाव्यावरून. त्या घराची मालकीण सुविद्य अशी ‘ती’ घर कायमसाठी सोडून, पण सोबत असणाऱ्या जबाबदाऱ्या सोबत घेऊन वडिलांचं घर गाठते. तिथे आल्यावर तिला आपण चार दिवसांचे पाहुणे आहोत असं वाटायला लागतं. मग तिचं विचार करणं, एकटेपणाच्या भावनेनं ग्रासून जाणं, आपलं काहीच नाही या जाणिवेने सतत ‘सॉरी’, ‘थँक्यू’ अशा औपचारिक शब्दांचा वापर अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून या सिनेमातून एक अतिशय सुंदर रेखाचित्र तयार करण्यात आलेलं आहे. ते बघताना प्रेक्षक म्हणून आपल्याला आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची, आपल्या स्वतःच्या नात्यांची नकळतच जाणीव होते.

मृणाल कुलकर्णीने या सिनेमात अतिशय सुंदर आणि सहज अभिनय केला आहे. तिची व्यक्तिरेखा उभी करताना त्यातला सहज भाव पेपर ही दिग्दर्शकाची हातोटी नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा ‘वेलकम होम’ या सिनेमात जाणवते. तिचं उच्चशिक्षित असणं, पण आर्थिक व्यवहारांबद्दल अनभिज्ञ असणं, आपल्या घरामध्ये, प्रत्येक नात्यामध्ये मनाने गुंतत जाणं आणि जर ते तुटायची वेळ आली तर त्यात आपलं काहीच नव्हतं आणि आता आपण काय करायचं या भावनेने तुटून जाणं हे थोडय़ाफार फरकाने सगळीकडेच दिसतं. पूर्वीच्या काळी होतं, आताच्या काळी आहे आणि कदाचित उद्या भविष्यातही हीच परिस्थिती असेल. आपलं काही नाही, फक्त जबाबदाऱ्या आपल्या आहेत या भावनेतून आयुष्यभर तडजोडी करत राहणं एवढंच काय ते आपल्या हातात उरतं.

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांची एक वेगळीच हातोटी आहे. सिनेमा घडवताना ते केवळ करमणुकीचे साधन आहे. तेव्हा सूक्ष्म विचार न करता प्रेक्षकाला त्यापलीकडचे खूप काही देता येऊ शकतं. मुळात आपल्या दैनंदिन आयुष्यात जाणवणाऱ्या, पण कधीच व्यक्त न करता येऊ शकणाऱ्या गोष्टींना ते आपल्या सिनेमातून मूर्तरूप देतात आणि प्रेक्षकाला तो सिनेमा कुठेतरी आपल्याच आयुष्यातला भाग वाटू लागतो.

आणखी एक गोष्ट म्हणजे, या दोघांचा सिनेमा कायम एखाद्या विकारावर आणि त्यानिमित्ताने त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या नात्यांच्या गुंत्यावर, माणुसकीवर आणि वृत्तीवर भाष्य करणारा असतो. ‘वेलकम होम’ या सिनेमातही परावलंबत्व आणि ते सहज स्वीकारणारा समाज हा विकारच दाखवला आहे. खरं म्हणजे तो कधीही लक्षात येत नाही, पण त्याचं अस्तित्व मात्र मनात खोल कुठेतरी कधीतरी टोचत असतं. या सिनेमाच्या निमित्ताने ती बोच पृष्ठभागावर येते. उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन जाणून घेण्यासाठी या जोडगोळीचा प्रत्येक सिनेमा आवर्जून पाहावा.

मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, स्पृहा जोशी, डॉक्टर मोहन आगाशे, उत्तरा बावकर, दीपा श्रीराम, प्रांजली श्रीकांत, सेवा चौहान या प्रत्येकाचं काम अगदी खरं वाटावं इतकं सुंदर झालंय. सेवा चौहान तर अप्रतिमच. एकूणच कलाकार सिनेमाचं वर्तुळ पूर्ण करतो याची उत्तम प्रचीती हा सिनेमा पाहताना येते. ज्यात माणुसकी शिल्लक आहे, तो आपलं कर्तव्य पार पाडत राहणारच यात आजचा काळ आणि आधीचा काळ असं काही नसतं असे संवादातून आलेले विचार ऐकताना वाटतं की, किती खरं आहे हे आणि अशा टप्प्यांवर हा सिनेमा मनात उलगडत जातो.

बरं, उलगडल्या प्रश्नाला तसंच सोडून न देता त्याचं उत्तर शोधायचादेखील प्रयत्न या सिनेमाने केला आहे. या सिनेमात घडणारी प्रत्येक गोष्ट काहीतरी देऊ पाहते. ते घ्यावं. कारण आपल्या मनातल्या कधीच पृष्ठभागावर न आलेल्या त्या गोष्टी असतात. आपल्याला त्या गुंतागुंतीच्या वाटत असताना अशा सिनेमाच्या माध्यमातून त्या इतक्या सोप्या होऊन समोर येतात की, आपल्यालाच कोणीतरी समजून घेतंय असं वाटायला लागतं. या सिनेमाचं छायांकन संगीत, गीताचे शब्द, पार्श्वसंगीत, ध्वनीचा वापर सगळंच नेमकं आणि सिनेमाला परिपूर्ण करणारं आहे. कदाचित हा सिनेमा पाहताना कंटाळा येतोय की काय असं वाटू शकेल, पण हा किंवा अशा पद्धतीचे सिनेमे पाहताना नुसती दृश्यं नाहीत, तर दृष्टिकोन ठेवून बघायची गरज आहे. नुसती करमणुकीची अपेक्षा न ठेवता त्यामागचा विचार जाणून घ्यायची आवश्यकता आहे. तेव्हाच हा सिनेमा खऱ्या अर्थाने भिडेल.

  • चित्रपट  वेलकम होम
  • दर्जा ****
  • निर्माते अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत
  • कथा/पटकथा/संवाद  सुमित्रा भावे
  • दिग्दर्शन  सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर
  • छायाचित्रण  धनंजय कुलकर्णी
  • गीते  सुनील सुकथनकर
  • संगीत  पार्थ उमराणी
  • कलाकार   मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, स्पृहा जोशी, दीपा श्रीराम, सिद्धार्थ                       मेनन,  सेवा चौहान, सारंग साठे, प्रांजली श्रीकांत
आपली प्रतिक्रिया द्या