स्वागत दिवाळी अंकाचे…

साहित्य संस्कृती –

कोरोनाने माणसाच्या जगण्याचे स्वरूप पालटले आहे. जगाच्या इतिहासात या वर्षाची ओळख कोरोनामय वर्ष म्हणून झाली. या परिस्थितीत जगण्याची नवी व्याख्या कशी असेल याबाबत साहित्य संस्कृती या दिवाळी अंकात मार्गदर्शन करण्यात आले आहे. आरोग्य, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय अशा अनेक जगण्याच्या पैलूंवर कोरोनाने घाला घातला. या सर्व बाबींवर भाष्य करणारा सॅनिटायझर, मास्क आणि कोरोनामय जीवन हा ज्येष्ठ पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख वाचनीय आहे. कोलमडलेली आर्थिक स्थिती भविष्यात त्याचे होणारे फायदे तोटे याबाबत वेध भविष्यातील अर्थकारणाचा हा डॉ. अभिजित फडणीस यांचा लेख मार्गदर्शन करेल. लेखक विनायक कुलकर्णी यांनी कोरोनानंतर जगावर आलेले मंदीचे संकट आणि आपली शिस्त याची माहिती दिली आहे. मनोरंजन सृष्टी या संकटामुळे पूर्णपणे ठप्प झाली. या अचानक आलेल्या मध्यंतराविषयी दिलीप ठाकूर यांनी सर्व परिस्थितीचा उलगडा केला आहे. अशा संकटसमयी आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबाला मागे सोडून लढणाऱया पोलीस प्रशासनाची पाठ लेखक दीपेश मोरे यांनी थोपटली आहे. शालेय विद्यार्थ्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी ओढाताण बदललेल्या शैक्षणिक धोरण आणि भविष्यात मिळणाऱया संधी सुविधा याबाबत जालिंदर सरोदे यांनी कोरोनानंतरची शाळा यावर मार्गदर्शन केले आहे. याशिवाय क्रीडा विश्वावरही याचा खोल परिणाम झाला याबाबत जयेंद्र लोंढे यांचा कोरोना आणि क्रीडा विश्व तसेच मंगेश वरवडेकर यांचा कोरोनाचा खेळखंडोबा हा लेख वाचता येईल.
संपादक – वंदना नाईक, मूल्य – 100 रुपये

गंधाली – 

कथा, कविता, विश्लेषण, लेख, गमतीदार गोष्टी आणि व्यंगचित्र यामुळे यंदाचा गंधालीचा दिवाळी अंक अतिशय खुमासदार झाला आहे. या अंकाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे यावर शेतात राबणारी बैलजोडी आणि बळीराजाचा सन्मान करण्यात आला आहे. शिवाय ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांची ढवळ्या पवळ्या ही कविता विशेष लक्षवेधी ठरत आहे. अंकात अनंताचे रूप जाणिले कुणी ही गिरिजा कीर यांची कथा, वसंत वाहोकर, डॉ. मधुकर वर्तक यांची तकटी, अशोक लोटणकर यांची झाकली मूठ कथा, यासह अलका कुलकर्णी, अनघा तांबोळी, राजेंद्र वैद्य, प्रतिभा सराफ, आर. खाकुर्डीकर, संजीव गिरासे, दत्तात्रय म्हेतर यांच्या कथा वाचायला मिळतील. रमेश सावंत यांचा इराणी हॉटेलची अनोखी दुनिया तर वर्षा रेगे यांचा लॉक डाऊननंतरची प्रतीक्षा हे लेख वाचनीय आहेत. कविता विभागात राजीव जोशी, सुधीर देवरे, अनिल कांबळी, अजय कांडर, दमयंती भोईर, अविनाश पोईनकर, सोनाली नावांगुळ, अनिल रत्नाकर, प्रज्ञा भोसले, नारायण लाळे यांच्या सुमधुर कविता आहेत. वर्षभरात गंधाली घेत असलेल्या स्पर्धांचा निकाल या अंकात आहे. या अंकात असलेले व्यंगचित्र अंकाला चार चांद लावून परिपूर्ण करतात.
संपादक – डॉ. मधुकर वर्तक, मूल्य – 200 रुपये

प्रतिबिंब –

कसं असेल कोरोनानंतरचे जग या प्रश्नांची उकल प्रतिबिंब या अंकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यावरण आणि आरोग्यविषयी कहर दुष्टचक्राचा हा रेश्मा जठार यांच्या लेखाने अंकाची सुरुवात होत आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर डॉ. कल्पना भांगे यांचा अनिश्चिततेची टांगती तलवार, मानसी आमदेकर लिखित आसवांना वेळ नाही हे लेख अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. शिवाय अर्थकारण, शिक्षण, नव्या संधी, राजकारण आणि समाजकारण याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मनोज पटवर्धन लिखित survival ऑफ द फिटेस्ट, अभिजित ढमढेरे लिखित आता व्यवस्थेत अर्थ नाही, भक्ती समेळ लिखित वटवृक्षाची सावली पोलीस आणि प्रशासनातील भरोसा कर के देखो हा रवींद्र शिसवे यांचा लेख उत्कृष्ट आहे. याशिवाय आरोग्यविषयक मौखिक आरोग्याचा आरसा आणि व्हिटॅमिनचे महत्त्व हे लेख अंकाला पूर्ण करत आहेत. लेखिका ऋजुता लुकतुके यांचा सकारात्मक बदल घडवणारा लेख क्रीडा विश्वातून आहे.
संपादक – प्रज्ञा जांभेकर, मूल्य – 200 रुपये

ऋतुरंग –

दिगग्ज लेखकांची तगडी टीम घेऊन यंदाचा ऋतुरंग हा दिवाळी अंक सादर झाला आहे. गुलजार साहेब यांचा भारदस्त अंदाजात असलेला पहिलाच अपर्णा पाटील अनुवादित लेख धूप आने दो संपूर्ण अंकाची उत्सुकता वाढवतो. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची आतापर्यंतची कारकीर्द आणि त्यांनी केलेला संघर्ष याबाबत संघर्षातील माझे साथी हा प्रेरणादायी लेख पूजा सामंत यांनी अनुवादित केलेला आहे. याशिवाय स्वतःचा आवाज शोधताना, मोल हंटर आणि शिकार, विनय सहस्रबुद्धे यांचा धडपदीचे धडे आणि माझे अवस्थांतर हे लेख उल्लेखनीय आहे. याबरोबरच ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचा नात्यागोत्यातील लढाई, सुशीलकुमार शिंदे यांचा माझ्या पराभवाची गोष्ट, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा त्या निवडणूक, प्रशांत गडाख यांचा … आणि माझा भाऊ जिंकला हे लेख महत्त्वपूर्ण आहेत. यासह घुंगरांचा सन्मान, मी पाहिलेला हिंदकेसरी, अपयश हीच प्रेरणा, माझा मार्ग मी शोधला, याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात महिन्यांत आलेले अनुभव कथन करणारे एक विशेष भाग या अंकात वाचायला मिळेल. तसेच श्रीनिवास नार्वेकर, मंदार फणसे, मिलिंद जोशी, विनोद शिरसाट, मीनाक्षी पाटील यांचेही खुमासदार साहित्य हा अंक परिपूर्ण करतो.
संपादक – अरुण शेवते, मूल्य – 250 रुपये.

आपली प्रतिक्रिया द्या