निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारकडून कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न; सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन

मूळ वेतनाच्या 50 टक्के निवृत्तीवेतन, आठ लाखांवर कर्मचाऱ्यांना फायदा, 1 मार्च 2024 पासून लाभ मिळणार

सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी येत्या 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी हा इशारा दिल्याने मिंधे सरकार हादरले होते. कर्मचाऱ्यांना दिलासा न दिल्यास रोष वाढेल या भीतीने मिंधे सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना लागू करण्यास मंजुरी दिली. या योजनेनुसार कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी असलेल्या मूळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मिळणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना शनिवारी सुधारित पेन्शन योजना लागू झाली. त्याच पार्श्वभूमीवर राज्याने निर्णय घेतला. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना 1 मार्च, 2024 पासून ही योजना लागू होईल.

1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्ती झालेल्या साडेआठ लाखांपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

निवृत्तीच्या वेळी असलेल्या मूळ वेतनाच्या 50 टक्के वेतन निवृत्तीवेतन म्हणून मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना 60 टक्के इतके निवृत्तीवेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे.

या सुधारित निवृत्तीवेतन योजनेचा लाभ स्वीकारायचा की नाही हे सर्वस्वी कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणार आहे. लाभ स्वीकारायचा असेल तर सहा महिन्यांत त्यांना सहमती द्यावी लागणार आहे.

डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही सहमती एक महिन्यात द्यावी लागणार आहे.

मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषित्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे.

काढलेली रक्कम 10 टक्के व्याजासह भरावी लागणार

या योजनेंतर्गत सेवा कालावधीची गणना ही कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी निगडित असेल. ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरलेले नसेल तर तो कालावधी सेवा कालावधी म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. ज्या कालावधीचे अंशदान कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापण्यात आलेले नाही ते अंशदान कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधी पेन्शनसाठी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीअंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी वा नंतर काढलेली रक्कम 10 टक्के व्याजासह भरणे आवश्यक राहील.