कारची काच फोडून रिव्हॉल्वरसह लॅपटॉप पळवला

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर शहरातील औसा रोडवर हॉटेलच्या समोर थांबलेल्या कारची भरदिवसा काच फोडून कार मधील लॅपटॉप, तीन काडतूस भरलेले रिव्हॉल्वर हार्डडिस्कसह बँकेचे चेकबुक पळवण्यात आल्याची घटना येथे घडली.

या प्रकरणी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विशाल उत्तमराव जाधव यांनी तक्रार दाखल केली. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विशाल जाधव आपल्या कार क्र. एमएच २४ एएम ९११९ ने औसा रोडवरील हॉटेल तडका येथे आला. कार पार्क करून तो हॉटेलमध्ये गेला असता अज्ञात व्यक्तीने कारची काच फोडली आणि कारमधील तीन काडतूस असलेले रिवाल्व्हर, लॅपटॉप, हार्डडिस्क, बँकेचे चेकबुक असा सुमारे ८४ हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन पलायन केले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे हे करीत आहेत.