संघर्ष मृत्यू आणि जगण्याच्या धडपडीतला ।।दशक्रिया।।

49

>>वैष्णवी कानविंदे-पिंगे 

जवळच्या व्यक्तीचा मृत्यू ही घटना प्रत्येकासाठीच क्लेषदायक असते. मग त्या गेलेल्या व्यक्तीच्या पश्चात काही कमी राहू नये. त्याच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून प्रत्येकजण ऐपतीप्रमाणे सर्व गोष्टी पार पाडायला तयार असतो. अगदी रक्षाविसर्जनापासून दशक्रियाविधी आणि पिंडादानापर्यंत सगळं नीट व्हावं यासाठी सर्वोतपरी प्रयत्न असतात. मुळात दररोज असंख्य माणसांचा मृत्यू होत असतो आणि आपल्या गेलेल्या व्यक्तीची शेवटची कार्य यथासांग पार पाडवीत असं वाटणं ही खूप जास्त भावनिक गुंतवणूक असलेली ही अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे आणि म्हणूनच ती घडवून आणणाऱ्यांसाठी तो एक फायदेशीर व्यवसाय आहे. विधी करणारे किरवंत, राख पाण्यात विसर्जन करायला मदत करणारी पोरंटोरं, ती राख विसर्जन करण्यासाठी चाळणी पुरवणारे सावकार, मुंडन करणारे हजाम, जेवणावळी घालणारे आचारी, जेवणावळींचं सामान पुरवणारे दुकानदार, दशक्रिया विधीसाठी पत्रावळी, पीठं, तांदूळ पुरवणारी घरं एक ना अनेक… या भावनेचं मोठं अर्थकरण सुरू असतं. एखाद्या अपरिचिताच्या मृत्यूवर अनेकांची पोटं अवलंबून असतात. मग अनेक व्यवसाय जोडून आल्यावर त्या अर्थकरणातून राजकारण सुरू होतं… त्याला धर्म, मानवी वृत्ती अशा गोष्टींची जोड असतेच… अशा या गंभीर विषयावर चितारलेला ‘दशक्रिया’ हा सिनेमा.

वेगळा विषय घेतलेल्या या सिनेमाला अनेक पुरस्कार तर मिळाले आहेतच, पण सर्वात मानाच्या राष्ट्रीय सिनेमा पुरस्काराचा तो मानकरी ठरल्याने त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन तयार झालाय. तर अशा अनेक अपेक्षा घेऊन आलेला हा सिनेमा जरी विषयाचं गांभीर्य राखत असला तरी बऱ्याच अंशी तो भरकटल्यासारखा झाल्याने त्याची धग म्हणावी तशी जाणवत नाही.

मुळात हा विषय दशक्रियेच्या कोणासाठी तरी अत्यंत दुखद असणाऱ्या क्षणाचं दुसऱ्या कोणासाठी असणारं अर्थकरण असा आहे. पण या विषयाला बांधताना दिग्दर्शकाने अनेक फाटे दिल्यामुळे तो विषय म्हणावा तसा पकड घेत नाही. जेव्हा सिनेमा सुरू होतो तेव्हा पैठणच्या घाटावर सुरू असणारी दशक्रिया विधी घडताना दिसते. किरवंत केशव भटजी भावनिकरीत्या नातलगांना मनसोक्त लुटतात आणि सिनेमाची सुरुवात होते. त्यानंतर लगेचच एक उडतं गाणं पडद्यावर येतं आणि प्रेक्षक म्हणून काही एक विचार डोक्यात तयार होत असताना अचानक तो तुटला जातो. आणि हे असं सिनेमात अनेक ठिकाणी होतं. एखादं गंभीर दृष्यं पकड घेत असताना अचानक ते तोडून वेगळंच दृष्यं दाखवलं जातं किंवा दृष्यांचा परिणाम साधायच्या आतच वेगळा फाटा फुटतो आणि सिनेमा भरकटल्यासारखा होतो. पर्यायाने अपेक्षित ठसा उमटतच नाही.

मुळात या सिनेमाच्या आत दोन कथानकं दडलेली आहेत. एका लहान मुलाचं आणि गावातल्या दोन बलाढय़ शक्तींच्या परस्परातील वैराचं. पण जेव्हा सिनेमा म्हणून आपण या कलाकृतीकडे बघतो तेव्हा त्यातलं एकच कथानक घट्ट पुढे उभं रहाणं गरजेचं असतं, पण असं होत नाही. या दोन्ही कथा समांतर समोर येत रहातात आणि त्यामुळे ना धड इथे ना धड तिथे अशी काहीशी अवस्था हेते. शेवटाकडेही जेव्हा दिग्दर्शक येतो तेव्हा या दोन कथानकांच्या गुंत्यात तो इतका गुंतलेला दिसतो की शेवटही दोनच होतात आणि ही एक कथा म्हणून काही केल्या ठसतच नाही.

विषय जरी गंभीर असला तरी तो मांडताना त्यात सहजता अपेक्षित होती, पण काही ठिकाणी उगाचच खेचाखेच झालीय. उदाहरणार्थ, गुढीपाडव्याचं जे दृष्यं आहे त्यात किरवंत पूजा करायला येतात आणि तिथे त्यांचा पत्रीसरकारशी वाद होतो. हा वाद निष्फळ वाटतो. वर्षानुवर्ष जर गावात एखादी प्रथा सुरू आहे तर नेमका आत्ताच का वाद व्हावा! बरं जरी तो प्रासंगिक असेल असे समजू…. पण तरीही पुढच्या घटनाक्रमांना घडवण्यासाठी ठिणगीची आवश्यकता होती म्हणून पटकथेत ते दृष्यं घातलंय असं प्रकर्षाने वाटत रहातं.

पत्रीसरकारच्या लग्नाचं दृष्य आणि पुलावर भटजींनी कारस्थान शिजवणं यातही काही मेळ आहे की काय असं वाटत रहातं. पण त्या प्रसंगाला जितकं गंभीरपणे चित्रित केलंय ते पहाता ते दृष्यं फुसका बारच ठरतं. अशी अनेक दृष्यं, दृष्यक्रम फसल्यासारखे वाटतात. परिणामी हा सिनेमा त्याच्या गांभीर्यासह मनात झिरपायला फोल ठरतो.
ध्वनीचा वापर, छायांकन या गोष्टी खूप छान जमून आल्या आहेत. अवाढव्य पुलाच्या खालनं वहाणारी नदी आणि एका कोपऱयात धगधगणारी चिता अशी काही टॉप अँगलची दृष्यं अंगावर काटा आणतात. शेवटाकडच्या दृष्यामध्ये उत्सुकता ताणली जाते खरी, पण ते दिग्दर्शित करताना मेलोड्रामाच्या दिशेने झुकलेलं वाटतं. त्यामुळे त्यातलं वास्तव म्हणावं तसं आपल्या अंगावर येतच नाही.

या सिनेमातल्या व्यक्तिरेखा चांगल्या उभ्या राहिल्या आहेत. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, आर्य आढव, विनायक घाडीगावकर, अदिती देशपांडे, आशा शेलार अशा सगळय़ाच कलाकारांनी सहज कामं केलीयत. बालकलाकार असूनही सहज अभिनयाची समज पहाताना चकीत व्हायला होतं.

मुळात हा गंभीर विषय आणि त्याच्या भोवती चालणारे व्यवहार, पोट हातावर घेऊन चालणारी माणसं या गोष्टी पहाणं हा थरारक अनुभव आहे. मृत्यूनंतरच्या विधी आणि त्या विधींमुळे शक्य होणारं जगणं अशा या विचित्र त्रांगडाची काहीशी कल्पना हा सिनेमा पहाताना येते. एक अनुभव म्हणून हा सिनेमा जरूर पहावा. पण ‘दशक्रिया’सारखा सिनेमा जर नेमकेपणाने मांडला असता, त्याची लांबी कमी आणि दृष्यं अधिक परिणामकारक झाली असती. तसंच दिग्दर्शन आणि संकलन या दोन्ही गोष्टीत सुसंवाद घडला असता तर जास्त प्रभावी ठरला असता असं मात्र वाटल्याशिवाय राहावत नाही.

दर्जा : अ़़डीच स्टार
सिनेमा : दशक्रिया
निर्मिती : कल्पना विलास कोठारी
दिग्दर्शन : संदीप भालचंद्र पाटील
पटकथा/संवाद/गीत : संजय कृष्णाजी पाटील
संगीत : अमितराज
छायांकन : महेश अनेय
कलाकार : दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, अदिती देशपांडे, नंदकिशोर चौघुले, मिलिंद पाठक, आशा शेलार.

आपली प्रतिक्रिया द्या