महावितरणच्या हलगर्जीपणाचा फटका, वर्षभर राबून पिकवलेल्या भाताची क्षणार्धात राख झाली

32
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, शहापूर

सर्वत्र धूमधडाक्यात दीपावली साजरी होत असताना शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील दोन शेतकऱ्यांवर मात्र ‘वीज’ कोसळली. शेतावरून गेलेल्या वीजवाहिनीमध्ये स्पार्किंग झाल्याने या शेतकऱ्यांच्या खळ्यातील सुमारे 500 भातांचे भारे जळून खाक झाले. वर्षभर शेतात राबून पिकवलेला भाताचा दाणान्दाणा क्षणात भस्मसात झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील किन्हवली येथील विजय देशमुख व रमेश चौधरी या दोन शेतकऱ्यांनी सुमारे अडीच एकरांत मेहतन घेऊन भातपीक घेतले होते. कापणीनंतर भातपीक त्यांनी खळ्यात ठेवले होते. बुधवारी दुपारच्या वेळी खळ्यावरून गेलेल्या वाहिनीमधून अचानक स्पार्क होऊ लागले आणि खळ्यात कापून ठेवलेल्या भाताच्या भाऱ्यावर ठिणगी पडून आग लागली. यामध्ये विजय देशमुख यांचे 180 व रमेश चौधरी यांचे 250 असे एकूण 430 भारे जळून खाक झाले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत भाताचे भारे भस्मसात झाले. याबाबत किन्हवलीचे तलाठी घोलप यांनी पंचनामा केला असून शहापूर तहसील कार्यालयात पाठवला असल्याचे सांगितले.

22 क्विंटल तांदळाचे नुकसान
आधीच पावसाने ओढ दिली असता पीक कमी आले. त्यात महावितरणच्या गलथान कारभारामुळेच भाताचे भारे जळून खाक झाले आहेत. या भातपिकांमधून किमान 20 ते 22 क्विंटल तांदूळ तयार झाला असता. भातपीक जळाल्यामुळे आता पुन्हा मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकावा लागणार असल्याने शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देशमुख व चौधरी या शेतकऱ्यांनी केली आहे.

summary- rice grain got burnt cause carelessness of mseb

आपली प्रतिक्रिया द्या