आयसीसीच्या उत्पन्नात मोठय़ा वाटय़ाचा हिंदुस्थानलाच हक्क – रिचर्ड गूड

आयसीसीच्या उत्पन्नात सर्वात मोठा वाटा हिंदुस्थानी क्रिकेटचाच आहे. त्यांच्याचमुळे जागतिक क्रिकेटमध्ये आयसीसीच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे आयसीसीच्या उत्पन्नातील 38.5 टक्के वाटय़ाचा हिंदुस्थानच हकदार असल्याचे मत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गूड यांनी व्यक्त केले.

आयसीसीने नुकतेच 2024 ते 27 या वर्षांसाठी प्रस्तावित ‘रेव्हेन्यू शेअर मॉडेल’ सादर केले होते. त्या मॉडेलनुसार हिंदुस्थानला आयसीसीच्या 600 दशलक्ष डॉलर्स उत्पन्नापैकी 38.5 टक्के हिस्सा मिळू शकतो. हा हिस्सा पाहून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पोटात दुखू लागले होते आणि त्यांनी मॉडेलला आपला विरोध दर्शविला आहे. आयसीसीने सादर केलेल्या रेव्हेन्यू शेअर मॉडेलमध्ये हिंदुस्थानचाच बोलबाला आहे आणि पुढेही राहील, असे दिसून येत आहे. हिंदुस्थानला मिळणारा सर्वाधिक वाटा पाहून पाकिस्तानने याच्यावर आक्षेप घेतला असून, हिंदुस्थानला मिळणारा हा वाटा हास्यास्पद असल्याचे मत पीसीबीच्या अधिकाऱयांनी व्यक्त केले आहे.