प्रवासी उतरताच दागिन्यांची बॅग घेऊन रिक्षा चालक पळाला, बिहारच्या नक्षलग्रस्त भागातून पोलिसांनी पकडून आणले

प्रवासादरम्यान दोघा प्रवाशांचे संभाषण ऐकून रिक्षा चालकाची नियत फिरली. घाटकोपर स्थानकाजवळ रिक्षातून प्रवासी उतरताच चालकाने त्यांची बॅग चोरून पोबारा केला. 60 तोळय़ांचे सोने चोरून रिक्षा चालकाने बिहार गाठले, मात्र घाटकोपर पोलिसांनी शिताफीने तपास करीत दोघा आरोपींना नक्षलग्रस्त भागातून शोधून काढले.

गत सप्टेंबर महिन्यात राजेश वरिया (40) याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर एक रिक्षा पकडून ते घाटकोपर येथे निघाले. त्यावेळी राजेश यांच्यासोबत असलेल्या सहकाऱयाशी ते त्यांच्या बॅगेत असलेल्या सोन्याबद्दल चर्चा करत होते. दोघांचे संभाषण ऐकून चालकाची नियत फिरला. घाटकोपर स्थानकाजवळ राजेश व त्याचा सहकारी रिक्षातून उतरले आणि ते बॅग रिक्षातून घेणार तेवढय़ात चालकाने चलाकी करत रिक्षा वेगात नेली. राजेशने घाटकोपर पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दिली. खबरे व तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केल्यावर आरोपी त्याच्या बिहार येथील गावी पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे तसेच कोयंडे, देवार्डे, पंक, नागरे, भोकरे, गव्हाणे या पथकाने बिहार गाठले.  आरोपी रिक्षा चालक नंदकिशोर यादव (22) हा नक्षलग्रस्त भाग असलेल्या लोहा परिसरात राहत असल्याचे स्पष्ट होताच स्थानिक पोलिसांच्या मदतीने यादवच्या मुसक्या आवळल्या. यादवने सरवणकुमार साहू (31) याच्या मदतीने सोने सराफांना विकल्याने पथकाने सरवणकुमार यालाही अटक  केली आहे.