सध्या, मला मुस्लिम मतं नको, त्यांच्याकडे मतं मागणार नाही! आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Himanta Biswa Sarma

ईशान्येकडील मणिपूर हे राज्य गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचारानं पेटलं आहे. त्यामुळे साऱ्या देशाचं लक्षं ईशान्येकडील राज्यांकडे वळलं आहे. अशातच ‘सध्या, मला मुस्लिम मतं नको’, अशा विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी केल्यानं नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

आम्ही ‘व्होट बँकेचं राजकारण’ करत नाही आणि त्यामुळे काँग्रेसप्रमाणे मुस्लीम समाजाशी संबंधित मुद्द्यांशी राजकारण कधी करणार नाही, असं स्पष्ट मत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत व्यक्त केलं.

‘सध्या, मला मुस्लिम मतं नको. सर्व समस्या व्होट बँकेच्या राजकारणामुळे होतात… मी महिन्यातून एकदा मुस्लिम भागात जातो, त्यांच्या कार्यक्रमांना जातो आणि लोकांना भेटतो, पण मी राजकारणाचा विकासाशी संबंध जोडत नाही. मला मुस्लिम समाजाला जाणिव करून द्यायची आहे की त्यांचं काँग्रेसशी असलेलं नातं हे सर्व मतांसाठीचं राजकारण आहे’, असं सरमा एनडीटीव्ही सोबत बोलले.

‘मला मते देऊ नका. मला तुमच्या भागाचा येत्या 10 वर्षात विकास करू द्या. मला बालविवाह प्रथा संपुष्टात आणायची आहे, मदरशांमध्ये जाणे बंद करायचे आहे. त्याऐवजी महाविद्यालयात जा. मी विशेषत: मुस्लिम मुलींसाठी सात महाविद्यालयांचं देखील उद्घाटन करणार आहे’, असंही ते यावेळी म्हणाले.

ईशान्येकडील राज्यात भाजपच्या सलग दुसर्‍या विजयानंतर 2021 मध्ये आसामचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून सर्बानंद सोनोवाल यांच्यानंतर आलेले सरमा यांनी स्पष्ट केलं की मुस्लिमांसाठी त्यांचं भाजपशी असलेलं नातं मतांच्या पलीकडे आहे हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.

‘काँग्रेसनं मुस्लिम भागात पायाभूत सुविधा किंवा शाळा बांधल्या नाहीत. पण मला त्यांचा विकास करायचा आहे. मी हे काम 10-15 वर्षे करेन, मग मी मुस्लिमांकडे मतं मागण्यासाठी जाईन. मी आता त्यांच्याकडून मतं मागितली तर ते व्यवहाराचं नातं होईल. पण मला तसं करायचं नाही’, असं मुख्यमंत्री म्हणाले. सरमा यांनी यावेळी स्पष्ट केलं की, गेल्या वेळी देखील राज्याच्या निवडणुकीतही त्यांनी मुस्लिम भागात प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता.