बदलापुरातील रिक्षाचालकाच्या मुलाची इस्त्रोत झेप;देवानंद पाटील याची ज्युनियर सायंटिस्टपदी निवड

पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा चालवत असतानाच सुरेश पाटील यांनी आपल्या मुलाला दर्जदार शिक्षण देण्याचा ध्यास घेतला.अखेर सर्व अडचणींवर मात करीत रिक्षाचालकाचा मुलगा देवानंद पाटील याने आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे.इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (भारतीय अंतराळ संशोधन संस्था ) परिक्षेत देवानंद ओबीसीमध्ये देशात पहिला आला असून त्याची ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे.त्याच्या या इस्त्रो भरतीबाबत पिता-पुत्र दोघांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

देवानंदचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनीअरपर्यंत झाले असून तो जमशेटपूर येथील टाटा स्टिल कंपनीत इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे.यापूर्वी देवानंदची रेल्वे लोको पायलट म्हणून निवड झाली होती,परंतु ही नोकरी त्याने नम्रपणे नाकरली.थोडं थांबा काहीतरी वेगळं करायचंय असे त्याने कुटुंबीयांना सांगितले.दरम्यान टाटा स्टिलमध्ये नोकरी करतानाच तो वेगवेगळ्या परीक्षा देत राहिला.त्यापैकीच इस्त्रोच्या परीक्षेत तो पहिला आला. महिनाभरातच त्याची नियुक्ती कोणत्या ठिकाणी होणार हो स्पष्ट असल्याचे देवानंदचे वडील सुरेश पाटील यांनी सांगितले.देवानंदची एक बहिण इंजिनीयर म्हणून नोकरी करत आहे.तर दुसरी जळगाव शासकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.या तिन्ही मुलांनी दहावीपासूनच सुयश मिळवले आहे.

यशाचा आनंद अवर्णनीय

सुरेश पाटील हे बदलापुरातील एक प्रामाणिक रिक्षाचालक असून दिवसरात्र 12-14 तास रिक्षा चालवून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत मुलांचे शिक्षण पूर्ण केले.त्यांच्या पत्नीने दररोज 7-8 तास पापड तयार करण्याचे काम करून त्यांना साथ दिली.मुलांच्या या यशाने या कष्टाचे चीज झाले असून हा आनंद अवर्णनीय असल्याच्या भावना सुरेश पीटील यांनी व्यक्त केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या