मी धर्मनिरपेक्ष, नास्तिक की राष्ट्रवादी?

43

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

रोज जातीभेदाला सामोरे जावे लागतेय. त्यामुळे प्रचंड मन:स्तापाचा सामना करावा लागत असून माझ्या धर्मालाच धर्मनिरपेक्ष, नास्तिक किंवा राष्ट्रवादी घोषित करा अशी अजब मागणी करणारी याचिका गुजरात उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याशिवाय गुजरात फ्रिडम ऑफ रिलिजन या कायद्यात नास्तिकता आणि धर्मनिरपेक्षता यांचा उल्लेखच नसल्याने या कायद्यातही बदल करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. एका रिक्षाचालकाची ही मागणी देशभरात चर्चेचा विषय बनली आहे.

राजीव उपाध्याय असे या रिक्षाचालकाचे नाव असून त्याच्या धर्माला धर्मनिरपेक्ष घोषित करण्याबाबतचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे त्याने म्हटले आहे. राज्यघटनेतील २५ आणि २६ व्या कलमांतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाला धर्म स्विकारण्याचे आणि त्याचा प्रचार तसेच प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी आपला अर्ज फेटाळण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आणि बेकायदेशीर असल्याचे राजीव उपाध्याय यांनी म्हटले आहे.

– उपाध्याय हे अनुसूचित जातीतील गुरू-ब्राम्हण आहेत.

– धर्माच्या कॉलममध्ये आपल्याला राष्ट्रवादी हा शब्द लिहिण्याची परवानगी द्यावी अशीही त्यांची मागणी आहे.

– नास्तिक आणि धर्मनिरपेक्ष मानले जात नसेल तर आपल्याला राष्ट्रवादी जाहीर करावे असेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारचा धार्मिक स्वातंत्र्यावर घाला

गुजरात फ्रिडम ऑफ रिलिजन ऍक्टमुळे धार्मिक स्वातंत्र्यावरच बंधने घालण्यात आली आहेत. या कायद्यात धर्मनिरपेक्षता किंवा नास्तिकता याबाबत तरतूदच नसल्यामुळे गुजरातमधील कुणीही धर्मांतर करू शकत नाही किंवा नास्तिकही होऊ शकत नाही. त्यामुळे हा कायदा राज्यघटनेच्या विपरित असून हा प्रत्येकाच्या धार्मिक स्वातंत्र्यावरच घाला आहे. परिणामी, हा कायदाच बदलण्यात यावा अशी मागणीही उपाध्याय यांनी याचिकेत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या