`रिंगण`च्या संत विसोबा खेचर विशेषांकाचे पंढरपुरात प्रकाशन

सामना ऑनलाईन । पंढरपूर

संतपरंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या `रिंगण` वार्षिकाच्या संत विसोबा खेचर विशेषांकाचे पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

वाचा: संत विचारांचे ‘रिंगण’

दिवाळीचे अंक असतात तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा असलेल्या आषाढी एकादशीचे अंकही असायला हवेत, या भूमिकेतून `रिंगण`ची सुरुवात झाली आहे. याआधी संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई आणि संत निवृत्तीनाथ यांच्यावरील विशेषांकांना अभ्यासक आणि वारकरी दोघांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. संत नामदेवांचे गुरू, लिंगायत साहित्यातील आद्य लेखक तसेच लिंगायत आणि वारकरी संप्रदायात समन्वय साधणारे महापुरुष, अशी संत विसोबा खेचर यांच्या कार्यकर्तृत्त्वाची ओळख या विशेषांकातून करून देण्यात आली आहे. संत विसोबा खेचर यांच्या प्रभावाच्या पाऊलखुणा शोधणारे आळंदी, बार्शी, औंढ्या नागनाथ या ठिकाणांचे रिपोर्ताज तसेच डॉ. श्रीपाल सबनीस, शे. दे. पसारकर, अभय टिळक, अशोक राणा, संजय सोनवणी, नंदन राहणे आदी मान्यवर अभ्यासकांनी यात लेख लिहिले आहेत.

वाचावे असे काही-शोध एका संताचा

तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार भास्कर हांडे यांनी मुखपृष्ठावर संत विसोबांचे चित्र रेखाटले आहे. भरगच्च दर्जेदार मजकूर आणि फोटोंनी सजलेल्या या १५२ पानी अंकाची किंमत केवळ ८० रुपये आहे. सर्वच प्रमुख पुस्तकविक्रेत्यांकडे हा अंक उपलब्ध असेलच. त्यासाठी सहित वितरणचे सुधीर शिंदे यांना ९८६७७५२२८० आणि ९९६०३७४७३९ या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या