डबा धू! म्हटल्याने सहाय्यक भडकला, वैमानिकाला धुवायला निघाला

76

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

वैमानिकाने डबा धुवायला सांगितल्याने विमानातील त्याचा सहकारी त्याच्यावर भयंकर संतापला होता. याच मुद्दावरून सहाय्यक आणि वैमानिकामध्ये हाणामारी होणार होती, मात्र विमानातील इतर सहकाऱ्यांमुळे हा प्रसंग टळला. धक्कादायक बाब ही आहे की हा सगळा तमाशा प्रवाशांसमोर सुरू होता. एअर इंडियाच्या बंगळुरु-कोलकाता विमानात हा प्रकार घडला आहे. या घटनेची एअर इंडिया आणि नागरी उड्डयन महासंचालकांनी चौकशी सुरु केली आहे.

हे विमान बंगळुरूहून कोलकात्यासाठी रवाना होणार होतं. या विमानाच्या वैमानिकाने घरून त्याचा डबा आणला होता. डब्यातलं जेवण गरम करण्यास त्याने एका वरिष्ठ सहकाऱ्याला सांगितलं होतं. जेवण झाल्यानंतर त्याने दुसऱ्या एका सहकाऱ्याला डबा धुवून आणायला सांगितला. याला त्या सहकाऱ्याने नकार दिल्याने दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. या भांडाभाडीमध्ये विमानाच्या उड्डाणाला दोन तास उशीर झाला. अखेर या दोघांसाठी बदली वैमानिक आणि सहकारी नियुक्त करण्यात आला आणि नंतरच या विमानाने उड्डाण केले.

एअर इंडियाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या दोघांना चौकशीसाठी दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. चौकशी होईपर्यंत दोघांना ड्युटी न लावण्याचेही आदेश देण्यात आले आहे. हा सगळा प्रकार विमान टेकऑफ करण्याआधी झाला हे नशीब म्हणावं लागेल कारण यापूर्वी एअर इंडियाच्या विमानातील सहकाऱ्यांमध्ये विमान हवेत असताना वादावादीचे प्रकार घडलेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या