गुजरातेत राम मंदिर निधी संकलनासाठीच्या यात्रेत दंगल, मजुराला भोसकून ठार मारले

गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत झारखंडमधून मजुरीसाठी आलेल्या एका मजुराचा मृत्यू झाला आहे. गांधीधामजवळच्या किडाणा गावामध्ये ही दंगल उसळली होती. या दंगलीदरम्यान या मजुराला चाकूने भोसकून ठार मारण्यात आलंय. अयोध्येत उभ्या राहात असलेल्या राम मंदिरासाठी निधी गोळा करण्यासाठी रविवारी एक यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेदरम्यान हिंदू आणि मुसलमानांमध्ये दगडफेक झाली आणि नंतर दंगल उसळली होती.

अर्जुन सावईयो (30 वर्ष) हा झारखंडहून गुजरातमध्ये मजूर कामासाठी आला होता.  तो रिक्षाने जात असताना दंगेखोरांनी त्याची रिक्षा अडवली आणि त्याला भोसकून ठार मारला. तो ज्या रिक्षातून जात होता त्या रिक्षाला दंगेखोरांनी आग लावली आणि रिक्षाचालकालाही भोसकले होते.  किडाणा गावामध्ये या दंगलीमुळे कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्जुन याच्या खुनाबद्दल गांधीधाम बी डिव्हीजन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विश्व हिंदू परिषदेने किडाणा गावात निधी संकलनासाठी यात्रा काढली होती.  ही यात्रा मस्जिद चौकापर्यंत पोहोचली असताना यात्रेतील लोकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली होती.  या घोषणाबाजीने तिथले मुसलमान भडकले आणि दोन गटात वादावादीला सुरुवात झाली.  हा वाद सुरू असताना मुसलमानांनी यात्रेवर दगडफेक करायला सुरुवात केली.  यात्रेतील लोकांनी रक्षाच्या दिशेने धाव घेतली आणि हिंदूंच्या गटातूनही दगडफेकीला सुरुवात झाली. या दगडफेकीची बातमी गावात पसरताच दांडके, लाठ्या-काठ्या आणि शस्त्र घेतलेली माणसं दोन्ही बाजूच्य गटाला येऊन सामील झाली.

परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसायला लागल्यानंतर या गावात पोलिसांनी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली.  या दंगलीमध्ये काही पोलीसही जखमी झाले आहेत.  जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा मारा करावा लागला. पोलिसांनी जमावाला पांगवल्यानंतर पुन्हा तिथे दंगल उसळू नये यासाठी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या