रिषभ पंत बनू शकतो हिंदुस्थानी संघाचा कर्णधार, सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

rishabh-pant

हिंदुस्थानच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या सुनील गावस्कर यांनी रिषभ पंतबाबत एक मोठे विधान केले आहे. पंत हा हिंदुस्थानी संघाचा भविष्यातील कर्णधार आहे अशी भविष्यवाणी गावस्कर यांनी केली आहे. IPL-14 मध्ये श्रेयस अय्यर याच्या अनुपस्थितीत पंत याने दिल्ली कॅपिटल्सची धुरा सांभाळली होती. पंतने 8 पैकी 6 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला होता. आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित होईपर्यंत दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता.

आयपीएलमध्ये पंत याने ज्या पद्धतीने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले ते पाहून गावस्कर प्रभावित झाले आहेत. पंतने चुका जरूर केल्या मात्र पंत याच्यात नव्या गोष्टी शिकण्याची जबरदस्त इच्छा असून त्याने काही गोष्टी जर सबुरीने घेतल्या तर तो यशस्वी कर्णधार बनू शकतो असं गावस्कर यांनी म्हटले आहे. स्पोर्ट्सस्टारमध्ये लिहिलेल्या स्तभांमध्ये त्यांनी ही बाब नमूद केली आहे. या स्तंभात त्यांनी म्हटलंय की “रिषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सचा संघ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ बनला. सहाव्या सामन्यानंतर पंतला कर्णधारपदाबाबत सर्वाधिक प्रश्न विचारले जाऊ लागले. समालोचक कर्णधारपदावरूनच त्याला अधिक प्रश्न विचारत होते. रिषभ पंतमध्ये प्रचंड क्षमता आहे जी त्याला संधी मिळाली तर तो सिद्ध करू शकेल. पंतने चुका जरूर केल्या आहेत, मात्र कोणता कर्णधार चुका करत नाही ?”

सुनील गावस्कर यांनी त्यांच्या लेखात म्हटलंय की पंत भविष्यातील हिंदुस्थानी संघाचा कर्णधार आहे, आणि यात कोणतीही शंका नाही. कारण त्याने जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा स्वत:मध्ये सुधारणा करत संधीचे सोनं करण्याचा प्रयत्न केला. रिषभ पंत याने दिल्ली कॅपिटल्सचं प्रभावी नेतृत्व तर केलंच शिवाय 8 सामन्यात 35 च्या सरासरीने 213 धावाही केल्या.

आयपीएलपूर्वी झालेल्या ऐतिहासिक ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही रिषभ पंतने जबरदस्त कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अनुभवी क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हिंदुस्थानी संघाने मालिका विजय मिळवला होता, या विजयामध्ये पंत याचा मोठा वाटा होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर हिंदुस्थानात आलेल्या इंग्लंडला पराभूत करतानाही रिषभ पंतने तमक दाखवली होती. पंत सातत्याने त्याच्या चुका सुधारताना दिसत असून यष्टीरक्षणासोबतच फलंदाजी कशी चांगली करता येईल याकडेही तो बारकाईने लक्ष देत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या