घर सुचवता का घर…! ऋषभ पंतची ट्विटरवरून चाहत्यांना साद; यासाठी शोधतोय नवीन घर

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत सध्या चर्चेत आहे. त्याने ब्रिस्बेन कसोटीत टीम इंडियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र सध्या एका समस्येत अडकला आहे. त्याला नवं घर खरेदी करायचं आहे आणि तीच त्याच्यासाठी अडचणीची गोष्ट आहे. कुठे घर घ्यावं असा प्रश्न त्याला पडला आहे.

23 वर्षांचा ऋषभ पंत हा मूळचा उत्तराखंड येथील आहे आणि तो दिल्लीजवळ घर शोधत आहे. ऋषभ पंतने ट्विटरवर यासंदर्भात आपल्या चाहत्यांना पर्याय विचारला आहे. तो म्हणतो की, ‘गुरुग्राम निवडलं तर चागलं पडेल का? आणखी काही पर्याय आहे का?’

पंत आपल्या ट्वीटमध्ये लिहितो की, ‘ऑस्ट्रेलियाहून परतल्यापासून घरचे लोक मागे लागले आहेत की नवीन घर घे. गुरुग्राम निवडलं तर चागलं पडेल का? आणखी काही पर्याय आहे का?’

ऋषभ पंतच्या या प्रश्नावर चाहतेही भारीच सल्ले देत आहेत. चाहते त्याला दिल्ली, जोधपूर, हैदराबाद अशा शहरांमध्ये घर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.

ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर ऋषभ पंत माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी सोबत दिसला होता. धोनीची पत्नी साक्षी हिने फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ऋषभ पंतही दिसतो आहे.

ऋषभ पंतने ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या अंतिम कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात नाबाद 89 धावा ठोकल्या होत्या. पंतच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 2-1 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकता आली होती.

धोनी सोबत झालेल्या तुलनेबद्दल ऋषभ पंत म्हणाला की, धोनी सारख्या खेळाडूसोबत तुलना झाल्यास आवडतेच. तुम्ही माझी धोनीसोबत तुलना करतात हे चांगलंच आहे. मात्र माझी तुलना कुणासोबत व्हावी अशी माझी इच्छा नाही. मला क्रिकेटमध्ये माझी एक ओळख निर्माण करायची आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या