“खेल खेल”मे दिल जिंकणारा अवलिया गेला, सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

941

जेष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज मुंबईच्या रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. निधनसमयी ते 67 वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  ऋषी कपूर यांच्या निधनाने सर्वच जण हळहळले आहेत.

हे वाचलंत का?  मी घरी कधी जाणार!ऋषी कपूर यांच्या ट्विटमुळे चाहत्यांचे डोळे डबडबले होते

हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांच्या शोकातून सावरत असलेल्या  सिनेसृष्टीवर गुरूवारी भल्या  सकाळीच  काळाने आणखी एक आघात केला. ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी मारिन लाईन्सच्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील 20 निकटवर्तीय उपस्थित होते. त्यांची मुलगी रिधिमा कपूर सहानी हिला मात्रन त्यांचे अंत्यदर्शन घेता आले नाही.

हे वाचलंत का? – ऋषी कपूरच्या ‘या’ फिल्मने धुऊन काढलं ‘मेरा नाम जोकर’चं अपयश

गुरुवारी सकाळी 8.45 मिनिटांनी ऋषी यांनी मुबंईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून ते ल्यूकेमिया आजाराशी लढत होते. गेल्या वर्षी मायदेशी  परतल्यानंतर ते फार आनंदी होते आणि त्यांना प्रत्येकाला भेटायची इच्छा होती. पण हा आजार त्याच्यापासून दूर गेला नाही.दरम्यान, कॅन्सरवरील उपचारासाठी ऋषी कपूर अमेरिकेत गेले होते. तिथे वर्षभर ते होते. त्यानंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात ते हिंदुस्थानात  परतले. फेब्रुवारी महिन्यात संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र बुधवारी प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

ऋषी यांना काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील इस्पितळात भरती केलं होतं. तेव्हाही त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता. यानंतर मुंबईत आल्यावर वायरल फीवरमुळे त्यांना इस्पितळात काही दिवसांसाठी भरती करावं लागलं होते ऋषी त्यांच्या सिनेमांप्रमाणेच निर्भीड प्रतिक्रियेसाठीही ओळखले जायचे. सामाजिक स्थितीवर ते अनेकदा सोशल साईट्सवर  भाष्य करायचे. मात्र २ एप्रिलनंतर त्यांनी एकही ट्वीट केलं नव्हतं.

छोट्या भावाच्या जाण्याने मी पार उध्वस्त झालोय -अमिताभ
ऋषी कपूर माझ्या छोट्या भावासारखाच होता.बॉलिवूडमध्ये त्याच्यासोबत काढलेले क्षण मी विसरू शकत नाही.माझ्या या बंधूंच्या अकाली एक्झिटने मी पार उध्वस्त झालोय अशी दर्दभरी प्रतिक्रिया बिग बी अमिताभ बच्चन यांनी  ऋषी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना दिली.रुपेरी पडद्यावर माझ्या छोट्या भावाची अथवा मुलाची भूमिका वटवणाऱ्या या अवलिया कलाकाराला अखेरचा निरोप देण्याची वेळ माझ्यावर येईल असे मला वाटले नव्हते.पण शेवटी नियतीचा डाव कुणाला कळणार.माझ्या या छोट्या बंधूंच्या स्मृतींना मी श्रद्धांजली वाहतो अशा शब्दांत महानायक अमिताभ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दुःखाच्या घडीला आलिया बनली रणबीरची ताकद
आपले वडील ऋषी कपूर यांच्या आकस्मिक निधनाने पार कोलमडून गेलेला बॉलिवूड स्टार रणबीर कपूर याला या दुःखाच्या क्षणी त्याची मैत्रीण आलिया भट हिने मोठा आधार दिला.शोकग्रस्त रणबीरला धीर देण्यासाठी आलिया आपल्या कुटुंबासह रिलायन्स रुग्णालयात सकाळपासूनच उपस्थित होती. रणबीर आणि आलिया लवकरच विवाहबंधनात अडकणार होते. पण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे त्यांचा विवाह स्थगित करण्यात आला आहे. आपले वडील आपला शुभविवाह पाहण्यास हजर नसणार हीच खंत आपल्याला सलत राहणार असे रणबीरने सांगितले.

ऋषी अंकल गेले यावर विश्वासच बसत नाही -विराट कोहली
बॉलिवूड स्टार ऋषी कपूर यांचे चित्रपट पाहत मी लहानाचा मोठा झालोय.मी त्यांच्या फॅन क्लबचा एक सदस्य आहे.कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मत केल्यावर ऋषी अंकल अचानक या जगाचा निरोप घेतात यावर विश्वासच बसत नाहीय ,अशी भावना ऋषी कपूर यांना आदरांजली वाहताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केली.काल इरफान खान आणि आज ऋषी अंकल अशा दोन महान कलाकारांना काळाने आपल्यापासून हिरावून नेले याचेच मोठे दुःख आहे अशी श्रद्धांजली सिनेतारका आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मा -कोहली हिने वाहिली.

ऋषी कपूर यांची ही मागणी पंतप्रधान मोदी पूर्ण करणार का ?
कर्करोगाशी लढणाऱ्या ऋषी कपूर यांनी देशातील गरीब कुटुंबातील मुलांना केंद्र सरकारने मोफत शिक्षण ,वैद्यकीय सुविधा आणि त्यांच्या पालकांना पेन्शन अशा सुविधा द्याव्यात अशी मागणी केली होती.मी स्वतःसाठी सरकारकडे काही मागत नाही ,पण देशातील कोट्यवधी गोरगरीब कुटुंबांचे हाल मला पाहवत नाहीत ,असे कळकळीचे आवाहन ऋषी यांनी केले होते.ऋषी कपूर यांच्या महानिर्वाणानंतर त्याची ही इच्छा केंद्रातील मोदी सरकार पूर्ण करील का ,असा सवाल ऋषी यांचे चाहते करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या