ऋषी कपूर यांचे निधन

4126

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली. ऋषी कपूर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना बुधवारी रात्री तातडीने मुंबईतील एचएन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 67 वर्षीय ऋषी कपूर यांना कॅन्सरने ग्रासले होते आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. यामुळेच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

T 3517 – He’s GONE .. ! Rishi Kapoor .. gone .. just passed away ..
I am destroyed !

बुधवारी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रणधीर कपूर म्हणाले की, ‘ऋषी कपूर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना कॅन्सरचा आजार असून श्वास घेण्यास अडचण होऊ लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.’ बुधवारी ही स्थिती असताना गुरुवारी सकाळी त्यांना अधिक त्रास होऊ लागला होता. प्रकृती खालावल्याने अखेर त्यांचे निधन झाले.

29 एप्रिलला अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले होते. बॉलीवूड या धक्क्यात असतानाच ऋषी कपूर यांच्याही निधनाची बातमी आली. लागोपाठ दोन दिवस दोन दिग्गज कलाकारांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. सोशल मीडियाचा आधार घेत अनेकांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हिंदुस्थानच्या चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य योगदान देणाऱ्या कपूर घराण्यातील ऋषी कपूर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते आणि त्यांच्या अभिनयाचे अनेकजण चाहते होते.

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका लीलया पेलणाऱ्या ऋषी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पाय ठेवला होता. 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’मध्ये त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला होता. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. मुख्य भूमिकेतील अभिनेता म्हणून ऋषी कपूर यांचा बॉबी हा पहिला चित्रपट होता. डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांचा अभिनय असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतला होता. या चित्रपटातील भूमिकेसाठीही ऋषी कपूर यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

ऋषी कपूर यांचे काही गाजलेले चित्रपट

 • लैला मजनू
 • प्रेमरोग
 • रफू चक्कर
 • सरगम
 • कर्ज
 • नगिना
 • चांदनी
 • हिना
 • बोल राधा बोल
 • दामिनी
 • अजूबा
आपली प्रतिक्रिया द्या