कीटकनाशक फवारणीचे धोके

9912

सुनील कुवरे

विदर्भात कापूस आणि सोयाबीनवर कीटकनाशक फवारताना आतापर्यंत ३२ शेतक-यांचा मृत्यू झाला. २५ शेतक-यांना अंधत्व आले, तर सातशेच्या वर बाधित झाले आहेत. या घटनेने कृषी आयुक्त जागे झाले. सरकार आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे. जहाल कीटकनाशक उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्याचे आणि बंदी घालण्याचे आदेश दिले गेले. जुलै २०१७ पासून शेतकरी कीटकनाशक फवाऱयाने विष बाधित होऊन रुग्णालयात दाखल होत होते. त्यावेळीच दखल घेतली असती, तर असा हाहाकार उडाला नसता. प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत बातम्यांनंतर सरकारने दखल घेण्यात आली. हा प्रकार ‘वरातीमागून घोडे’ असा आहे. सरकारने मृत्यू झालेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत जाहीर केली. तसेच फवारणीसाठी मास्कचे वाटप करणार. सरकारने संवेदनशीलता दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु एकविसाव्या शतकात फवारणी करणाऱया शेतकऱयांचे बळी जावेत. हीच मुळात प्रगत महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. फवारणी करणाऱयांच्या नाकातोंडाव्दारे विषारी द्रव्ये शरीरात मिसळतात. शिवार विषारी झाल्याने किडी, अळ्यांचा जीव घेणारी रसायने माणसालाही मारत आहेत. अनेक वर्षांपासून काही विदेशी कंपन्या आपल्या देशात कीटकनाशकाच्या नावावर अत्यंत विषारी कीटकनाशके तयार करतात. नंतर त्याची जाहिरात करून ते औषध शेतकऱयांना घेण्यास बाधित करतात. असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. तरीही या फवारण्या जीवघेण्या का ठरल्या? फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची याची माहिती शेतकऱयांना होती का? त्यामुळे याचा दोष रसायनांना द्यावा की, शेतकऱयांना द्यावा? असे अनेक प्रश्न उभे राहतात. देशभरात कोणत्या पिकावर कोणते कीटकनाशक फवारावे, त्याची मात्रा किती असावी, फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी या सर्वांची माहिती देणाऱया राज्यात चार प्रयोगशाळा आणि चार कृषी विद्यापीठे आहेत, परंतु या संस्थांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. देशातील यंत्रणा इतकी सक्षम आहे की, शेतात प्रत्येक बी-बियाणे खत कीटकनाशकांची अत्यंत कठोरपणे करून दिली जात असेल, तर मग अशा घटना का घडतात? आजचा शेतकरी आधुनिक शेतीचा गुलाम आहे. शेतकऱयाला नवी पिके, संकरित बियाणे, रासायनिक खते, विषारी कीटकनाशकांचा वापर करतात, पण ही औषधे कीटकांना नव्हे तर माणसाला मारक ठरत आहेत. तेव्हा आता सरकारने यासंदर्भात गांभीर्याने विचार करून शेतकऱयांनी कोणती कीटकनाशके वापरावीत याचे कडक नियम करावेत. कीटकनाशकांच्या फवारणीत कोणती दक्षता घ्यावी यासाठी शेतकऱयांमध्ये मोठय़ा प्रमाणात जागरुकता करणे महत्त्वाचे आहे. तसेच शेतकऱयांनी शेतीसाठी कोणती औषधे वापरावीत याची दक्षता घ्यावी.

आपली प्रतिक्रिया द्या