राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईतच, ठाण्यातही रुग्णसंख्या वाढतेय

राज्यात आज 334 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 71 रुग्ण मुंबईतील आहेत. त्यापाठोपाठ 53  रुग्ण ठाण्याचे आहेत. त्यामुळे मुंबई व ठाण्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याची चिन्हे आहेत.

राज्यात आजच्या घडीला 1648 ऑक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वाधिक 946  पुण्यात तर त्या पाठोपाठ 361 मुंबईत आहेत. मुख्य म्हणजे हिंगोली, वाशिम, यवतमाळ, गोंदिया येथे एकाही ऑक्टिव्ह कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही.

सध्याच्या कोरोना संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेंद्र सरकारच्या सूचनेनुसार मुंबई, पुणे, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत आढळलेल्या 42 रुग्णांपैकी नऊ रुग्ण पुण्यातील आहेत तर आठ रुग्ण मुंबईतील आहेत. त्या खालोखाल नवी मुंबई, अमरावती, सांगली, संभाजीनगर, सातारा येथील आहेत. इतर रुग्ण गुजरात, उत्तर प्रदेश, केरळ, तामीळनाडू, राजस्थान, ओडिशा, गोवा, आसाम व तेलंगणा येथील आहेत.

मुंबईतील आठवडाभराची रुग्णसंख्या

15 मार्च – 31 रुग्ण

16 मार्च – 35 रुग्ण

17 मार्च – 36 रुग्ण

18 मार्च – 71 रुग्ण

19 मार्च – 52 रुग्ण

20 मार्च – 35 रुग्ण

21 मार्च – 61 रुग्ण

एका रुग्णाचा मृत्यू

राज्यात आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या राज्यातील कोरोनाचा मृत्यू दर 1.82 टक्के आहे.

आरोग्य विभागात अजूनही औरंगाबादच

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दररोज कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. राज्य सरकारने औरंगाबाद जिह्याचे छत्रपती संभाजी महाराज नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केले आहे. पण राज्याच्या सार्वजनिक आरोग्याच्या प्रेस नोटमध्ये अजूनही औरंगाबाद व उस्मानाबाद असा उल्लेख केला जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.