रिक्षाचालकाच्या सतर्कतेने दोन अल्पवयीन मुलींची घरवापसी

711
प्रातिनिधिक फोटो

नोकरीच्या शोधात बंगलोर येथून मुंबईत आलेल्या दोन अल्पवयीन मुलींची रिक्षाचालकाच्या सतर्कतेने घरवापसी झाली. रिक्षाचालक जितेंद्र सोनू यादव याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुली घरी पोहचल्यावर नातेवाईकांनी जितेंद्रचे आभार मानले.

शहरात महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा याकरिता विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. सुरक्षित प्रवासाकरिता नुकतेच कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्री पेड रिक्षा ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी दोन अल्पवयीन मुली प्री पेड रिक्षा स्टॅण्डवर आल्या. त्या दोघीना मुलाखतीसाठी अंधेरीच्या लोखंडवाला येथे जायचे होते. त्या दोघींकडे पैसे नव्हते. सोनू यांनी त्या दोघीना लोखंडवाला येथे नेले. जेथे मुलाखतीसाठी जाणार होते तेथील नंबर देखील बंद होता. नंबर बंद असल्याने त्या दोघीनी तेथील सुरक्षारक्षकाकडे विचारणा केली. सुरक्षारक्षकाने त्या दोघींकडे ओळखपत्राची मागणी केली. ओळखपत्र मागताच त्या दोघी रडू लागल्या. हा प्रकार सोनू यांच्या निदर्शनास आला. मुंबईत त्या दोघी नवीन असल्याने कोणी त्याचा गैर फायदा घेऊ नये म्हणून सोनू यांनी त्यांना पुन्हा लोकमान्य टर्मिनस येथे आणले. दीपक चव्हाण, गुलाब गुप्ता या महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेच्या सदस्यांनी त्या दोघीना जेवू घातले. त्यानंतर मायेने त्या दोघींची विचारपूस केली. एवढय़ावरच न थांबता  त्या दोघीना एक्स्प्रेसचे तिकीट काढून  घरी पाठवले. तसेच यादव यांनी त्या दोघीना प्रवासात अडचण येऊ नये म्हणून स्वतःचा नंबर दिला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्या दोघी घरी पोहचल्या. घरी पोहचल्यावर मुलींच्या कुटुंबीयांनी यादव यांचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या