साहसी खेळ…नदीवर स्वार…

40922

श्रीकांत उंडाळकर, [email protected]

आपल्या देशातील नद्या या खऱया अर्थाने जीवनदायिनी आहेत. जगण्यातील साहसही त्यांच्याकडूनच शिकावं…

कुंडलिका आणि वैतरणा..आपल्या महाराष्ट्रात कोलाड जवळील ‘कुंडलिका’ आणि कसारा जवळील ‘वैतरणा’ या दोन्ही ठिकाणी रिव्हर राफ्टिंग करता येते. इकडे मात्र हिमालयाइतके थंड पाणी नसते त्यामुळे पाण्यात जास्त वेळ मस्ती करता येते.  काही ठिकाणी ‘सॉफ्ट राफ्टिंग’ म्हणून शांत पाण्याच्या प्रवाहाचा अनुभवदेखील आनंद देतो. यात अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सीमेवरील जिया भरोली नावाची नदी, लडाखमधील नुब्रा खोऱयातील शायोक नदी अशासारख्या अनेक नदी प्रवाहांचा पर्याय आहे. मेघालयमधील हिंदुस्थान आणि बांगलादेश यांना विभागणाऱया ‘डावकी’ या नदीचे पाणी इतके नितळ आहे की यामधून बोटिंग करीत असताना खोल पात्रातूनदेखील नदीचा तळ स्पष्टपणे दिसतो.

सफर..हे झाले काही साहसी प्रकार. मात्र तुम्हाला खरंच याचा एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर एखादी नाव किंवा छोटीशी बोट घेऊन चांगले ६ ते ७ तासांची एखादी नदी सफर करावी आणि तेथील परिसराला भेट द्यावी. ज्यात तुम्हाला फक्त नदीवर अवलंबून असणारे जनजीवन जवळून पाहायला मिळेल. यामध्ये तिकडची लोकं आणि त्यांची घरं बांधण्याची पद्धत, खाऊ – पिऊचे विविध पदार्थ, कपडे, दागिने, संस्कृती, चालीरीती अशा अनेक प्रकारच्या गोष्टी पाहता येतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आसाममधील ब्रह्मपुत्रा आणि लडाखमधील सिंधू नदी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर.

साहसी खेळ…कुठल्याही नदीचा प्रवाह हा सर्वत्र सारखा नसतो तो कुठे शांत, कुठे जोरदार तर कुठे त्याचे रौद्र रूप पाहायला मिळते. अशा या प्रत्येक ठिकाणच्या प्रवाहाला आपण जवळून अनुभवू शकतो आणि ते म्हणजे ‘रिव्हर राफ्टिंग’सारख्या साहसी खेळांमधून. या रिव्हर राफ्टिंगची बात काही औरच आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तुम्हीही एकदा रिव्हर राफ्टिंगला जायलाच हवं. तसं तर हिंदुस्थानातील अनेक ठिकाणी हा साहसी खेळ अनुभवता येतो. यामध्ये सर्वात पहिले नाव म्हणजे ऋषिकेश येथील पवित्र अशा गंगा नदीचा प्रवाह. वर हिमालयातून येणारी गंगा नदी ऋषिकेशच्या नागमोडी वळणावळणातून जाताना आधी शांत आणि लगेचच रौद्र रूप धारण करते आणि म्हणून येथे रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी हिंदुस्थानातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक येत असतात. याचप्रमाणे सिक्कीम खोऱयातून वाहत येणारी ‘तिस्ता’ नदीमध्ये देखील रिव्हर राफ्टिंग करता येते. लडाखमधील सिंधू नदी, झंस्कार नदी, अरुणाचल आणि आसाममधून येणारी ब्रह्मपुत्रा, उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथील अलकनंदा, कर्नाटक दांडेली येथील काली नदी, कुल्लू – मनाली येथील बियास नदी आणि आपल्या महाराष्ट्रातील ‘कुंडलिका नदी’ अशासारखे अनेक पर्याय यासाठी उपलब्ध आहेत.

हिंदुस्थानातील अनेक प्रदेशातल्या नद्या या ज्या – त्या भागाला समृद्ध करतात. तेथील पिण्यासाठीचं पाणी तसेच पिकं, शेती, फळबागा, मासेमारी अशा सारख्या जीवनावश्यक गोष्टी या नदी मुळेच शक्य असतात. जसे दरवर्षी ब्रह्मपुत्रा नदीला येणाऱया पुरामुळे तसेच हिमालयातून येणाऱया गंगा नदीच्या पाण्यामुळे नदीलगतच्या प्रदेशात गाळ निर्माण होतो आणि या गाळामुळे नदीच्या कडेला असणाऱया शेत जमिनीला दर्जेदार पिकं मिळतात.

काय आहे रिव्हर राफ्टिंग ?

रिव्हर राफ्टिंग करताना आधी भीतीवजा उत्सुकता वाटत असते. कसे होईल, काय होईल, मला करता तर येईल न, मला पोहता येत नाही तरीही मी करू शकेन की नाही अशासारख्या अनेक प्रश्नांनी मनात घर केलेले असते. जसजशी छोटय़ाशा बोटीत ज्याला फ्लोट म्हणतात. बसायची वेळ जवळ येते तशी आपली धाकधूक वाढायला लागते. हृदयातले ठोके आपसूकच वाढू लागतात. प्रशिक्षकांनी व्यवस्थित माहिती दिल्यानंतर जेव्हा वास्तविकरीत्या रिव्हर राफ्टिंग सुरू होते तेव्हापासूनच एक एक असा वेगवेगळा अनुभव यायला सुरुवात होते. आधी हळूहळू वाहणारे पाणी जेव्हा वळणावळणाहून वाहत जाते आणि पुढे गेल्यावर जेव्हा रौद्र रूप धारण करते, तेव्हा त्या उसळणाऱया पाण्यावरून आपलं फ्लोट वर खाली होते जसे की एखाद्या एम्युसमेंट पार्कमधील रोलर कोस्टरमध्ये खाली वर होत, त्यासारखाच हा अनुभव असतो. हे बरेच वेळा आडवं तिडवं होते तर अनेकदा गटांगळ्यादेखील खायला मिळतात. कधी जोरात तर कधी हळू असा जोर चालूच असतो. राफ्टिंगसाठी आपल्यालाच त्या छोटय़ाशा फ्लोटमध्ये धडपडत आणि तोल सावरत बसून फ्लोट वल्हवायचा असतो. बरेच पुढे गेल्यावर जिकडे शांत प्रवाह असेल तिकडे पाण्यात डुंबायलादेखील मिळते आणि मजा येते. त्यामुळे या दोन तीन तासांमध्ये जी तारांबळ उडते ती कायम आपल्या लक्षात राहते. यामध्ये जर लडाख, उत्तराखंड, सिक्कीम अशासारख्या भागांमधील राफ्टिंग असेल तर नद्यांतील पाणी हे रक्त गोठवून टाकण्याइतके थंड असते. अशा ठिकाणी राफ्टिंग करण्याची जबरदस्त मजा येते.

पाण्याशी निगडित साहसी प्रकारात फक्त रिव्हर राफ्टिंग येत नसून त्यात कयाकिंग, वॉटर स्कूटर, बनाना बोट राईड इत्यादीसारख्या अनेक प्रकारचे खेळ आहेत. यातील कयाकिंग म्हणजे एकाच माणसासाठी असणारी अगदी छोटीशी बोट की ज्यात एकच माणूस जेमतेम बसेल आणि एकाच वह्याने तो एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे असे वल्हवत नदी पार करेल. यामध्ये पाण्याच्या अगदी सम पातळीलाच आपण जात असतो. हे करीत असतानादेखील पाण्याच्या कमी जास्त जोरामुळे ‘कयाक’ ज्या प्रकारे हलते आणि डावी उजवीकडे तसेच गोल गोल फिरतानाचा त्याचा अनुभव येणे याची मजा काही औरच आहे.

नदी आणि समुद्राच्या मधील भागात म्हणजेच खाडी भागातील पाणी भूभागात घुसून तयार झालेला परिसरदेखील निसर्गसंपन्न असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे केरळमधील ‘अलेप्पी’ म्हणजेच बॅक वॉटरसाठी प्रसिद्ध असलेला भूभाग आणि महाराष्ट्रातील कोकणातील अनेक जागा.

 

आपली प्रतिक्रिया द्या