दाऊदसोबत संबंध असलेल्या रियाझ भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला ? नवाब मलिकांचा फडणवीसांना सवाल

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. सगळ्यात गंभीर आरोप हा फडणवीस आणि रियाझ भाटी नावाच्या गुंडासंदर्भातील होता. भाटी याचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचा हवाला देत मलिकांनी म्हटले की याच भाटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले असताना त्यांच्यासोबत फोटो काढले होते. भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे.

फडणवीसांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले

रियाझ भाटी याला सहार विमानतळावर 2 बनावट पासपोर्ट बाळगण्याबद्दल पकडण्यात आले होते. या अटकेनंतर त्याची दोन दिवसांत सुटका कशी काय झाली असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे. भाटी तुमच्यासोबत सगळ्या सरकारी कार्यक्रमात का दिसायचा ? भाटी भाजप कार्यक्रमात का असायचा, तुमच्या डिनर टेबलवरही तो का असायचा? असे प्रश्नही मलिक यांनी फडणवीसांना विचारले आहेत.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या व्यक्तीची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय, माहितीची छाननी केल्याशिवाय त्याला पास मिळत नाही. पंतप्रधान मुंबईत आले असता भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढून घेतले. यावरून मलिक यांनी फडणवीसांना प्रश्न विचारला आहे की ही सगळी छाननी केली जात असतानाही रियाझ भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला?

फडणवीसांच्या प्रोटेक्शनमध्ये बनावट नोटांचा खेळ सुरू होता! मलिक

काळा पैसा, नकली नोटा यांना पायबंद घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदी केली होती. त्यानंतर संपूर्ण देशात बोगस नोटा पकडल्या जात होत्यास मात्र महाराष्ट्रात 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाराष्ट्रात बनावट नोटांचे एकही प्रकरण समोर आलं नाही असं मलिक यांनी सांगितले. कारण फडणवीसांच्या प्रोटेक्शनमध्ये बनावट नोटांचा खेळ सुरू होता असा आरोप त्यांनी केला आहे. 8 ऑक्टोबर 2017 रोजी DRI ने मुंबईतील बीकेसी इथे एक छापेमारी केली होती. छापेमारीमध्ये 14 कोटी 56 लाखांच्या बनावट नोटा पकडल्या होत्या. असं असताना फक्त 8 लाख 80 हजारांच्या बनावट नोटा असल्याचं सांगून प्रकरण दाबलं गेलं असा आरोप मलिक यांनी केला आहे. या प्रकरणी इम्रान आलम शेखला अटक करण्यात आली होती. हाजी अराफत शेख याचा इम्रान आलम शेख हा भाऊ असून याच हाजी अराफत शेख यांना फडणवीसांनी राज्य अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवला होता असा आरोपही मलिकांनी केला आहे.