रियाज भाटी याला फरार घोषित करण्याचा आदेश हायकोर्टाकडून रद्द

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह एका खंडणी प्रकरणात सहआरोपी असलेला रियाज भाटी याला दंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले असून या आदेशाला भाटी याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने आज रियाज भाटी याच्या याचिकेची दखल घेत त्याला फरार घोषित करण्याचा दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश रद्द केला.

खंडणीप्रकरणी परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज बारमालकांकडून पैसे घ्यायचा व हे पैसे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला द्यायचा. ऑक्टोबर 2021 मध्ये खंडणी प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर रियाजने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सत्र न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात ही याचिका फेटाळून लावल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी या प्रकरणात आरोपी विनय सिंह याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्याची माहिती भाटी याच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. तसेच तपास यंत्रणांनी विनय सिंह यांच्या निकालाला आक्षेप न घेता न्यायालयात आव्हान दिले नसल्याचे न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत न्यायमूर्तींनी रियाज भाटी याला फरार घोषित करण्याचा दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश रद्द केला.