माढाजवळ विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू; पाचजण जखमी

696

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील अरण ( ता. माढा) येथील अरण पंढरपूर पालखी मार्ग चौकात रविवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला. एक चारचाकी तीन दुचाकींना धडकली, त्यानंतर दूर जाऊन चारचाकी उलटली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर पाचजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

माजी सैनिक सोमलिंग रेवप्पा उत्साही (वय 48, रा.उल्हासनगर, जि.ठाणे) आपल्या कुटुंबासह चारचाकी गाडीने मुंबईहून सिकंदराबादकडे जात होते. त्यांची गाडी अरण येथील पालखी मार्ग चौकात आल्यावर समोरील गाडी रस्ता ओलांडत होती. त्या गाडीला चुकवण्याच्या प्रयत्नात उत्साही यांची कार दुभाजकाला धडकली. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आली. त्यावेळी समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना कारने धडक दिली. दुचाकीवरील राजेंद्र तुकाराम रंदवे (वय 55) व रविकिरण साळुंखे (वय 33 ) यांना गाडीची धडक बसली. त्यानंतर त्यांच्या गाडीला आणखी एक दुचाकी धडकली. त्यात शिवाजी नागनाथ शिंदे व शिवाजी नागनाथ शिंदे हे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर चारचाकी पुढे जाऊन उलटली. या अपघातात चारचाकीतील प्रतिभा उत्साही (वय 42) आणि एका दुचाकीवरील रज्जाक कोरबु व शकील कोरबु यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन दुचाकीवरील आणि चारचाकी गाडीमधील तीन असे एकूण पाचजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने टेंभुर्णी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सह पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम महामार्ग पोलीसचे पडवळकर तातडीने घटनास्थळी पोहचत जखमींना रुग्णालयात हलवले.

आपली प्रतिक्रिया द्या