जगबुडी पुलानजीक महामार्ग उखडला, अपघातांचा धोका वाढला

29

सामना प्रतिनिधी । खेड

मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी पुलानजीकचा रस्ता पुर्णपणे उखडला गेला असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघातांचा संभाव्य धोका टाळण्यासाठी उखडला गेलेला रस्ता पुर्ववत करणे आवश्यक आहे परंतु महामार्गाच्या डागडुजीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराकडून रस्त्याच्या डागडुजीबाबत कोणतीच कार्यवाही सुरु नसल्याने प्रवाशी आणि वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुल हा धोकादायक पुल मानला जातो. पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे कमकुवत झाले असल्याने पुलावरून वाहने हाकताना चालकांच्या पोटात भितीचा गोळा आल्याशिवाय रहात नाही. २०१३ साली याच पुलावरून खासगी बस नदीपात्रात कोसळून ३७ प्रवाशांचा बळी गेला होता. त्यामुळे जगबुडी पुल धोकादायक पुल मानला जातो.

या ब्रिटीशकालीन पुलाची रुंदी कमी असल्याने समोरासमोर आलेले दोन वाहने पास करताना चालकाची कसोटी लागते. त्यातच आता रस्ता उखडला असल्याने पुलावरील अपघातांचा धोका वाढला आहे. पुलावर उखडलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करणे आवश्यक आहे. तशी मागणी प्रवाशी आणि वाहन चालकांकडून केलीही जात आहे परंतु महामार्ग चौदपरीकरणाचे काम ज्या ठेकेदार कंपनीने घेतले आहे ती ठेकेदार कंपनी रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत उदासीन असल्यामुळे महामार्गावरील अपघातांचा धोका कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे.

दोन दिवसांपुर्वी महामार्गावरील दाभीळ गावानजीक टँकर आणि मारुती डिझायर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात लोटे औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान युनिलिव्हर या कारखान्यातील दोन तरूण वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यु झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. मुंबई गोवा महामार्गावर होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यापासून या मार्गावर होणाऱ्या जीवघेण्या अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली असल्याने महामार्गाचे चौपदरीकरण कोकणला शाप की वरदान? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या