रस्ते कामातील कंत्राटाच्या वादग्रस्त प्रस्तावाला स्थायी समितीचा ‘रेड सिग्नल’

293

काळ्या यादीतील कंत्राटदारला आणि अयोग्य पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप स्थायी समितीत करण्यात आल्यामुळे रस्ते कामाचा एक प्रस्ताव नुकतेच स्थायी समितीने परत पाठवला. संबंधित प्रस्तावाच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करून अहवाल सादर करा असे निर्देशही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले.

‘एल’ विभागातील विविध रस्त्यांची झीज, भेगा, खड्डे, जलवाहिन्यांद्वारा होणारी गळतीच्या कामांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. मात्र भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरले. संबंधित काम मलनिस्सारण क़ंत्राट कामांमध्ये घोटाळ्याप्रकरणी काळ्या यादीत टाकले असताना अशा कंत्राटदाराला पुन्हा कंत्राट कसे दिले जाते, असा सवाल त्यांनी केला. संबंधित कंत्राटदाराला सी पॅकेट उघडण्यापूर्वीच तीन वेळा वाटाघाटी करून कंत्राट देण्यात आले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ‘सी पॅकेट’ न उघडताच वाटाघाटी कशी केली जाते. याबाबतचा अहवाल प्रशासनाने स्थायी समितीने द्यायला हवा असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटले. सी पॅकेट उघडण्यापूर्वीच अशा वाटाघाटी होणे चुकीचे आहे. काळ्या यादीतील कंत्राटदाराला काम कसे दिले जाते, असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक असिफ झकेरीया यांनी विचारला.

भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी संबंधित कंत्राटदाराची चौकशी व्हावी अशी मागणी केली. सर्वपक्षीय नगरसेककांनी प्रस्तावाला कडाडून विरोध केल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याबाबतचा अहवाल स्थायी समितीला द्यावा असे निर्देश प्रशासनाला देऊन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या