लक्ष्मी रस्त्याचे रुंदीकरण रद्द

शिवाजी, बाजीराव, टिळक, कुमठेकर, शास्त्री, नेहरू रोडचे रुंदीकरण कमी
पुणे– शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्त्याचे रुंदीकरण पूर्णत: रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता अशा महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण कमी करण्यात आले आहे. त्यामुळे, शहराच्या मध्यवस्तीतील अनेकांना दिलासा मिळाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डीपीतही नागरिक आणि व्यापार्‍यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे.
शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करताना पालिका प्रशासनाने मध्यवर्ती भागातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यावर अनेक हरकती-सूचना दाखल झाल्यानंतर नियोजन समितीने रस्त्यांचे रुंदीकरण रद्द करण्याची शिफारस केली होती. मात्र, सरकारकडे डीपी सादर करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने शहराच्या वाहतुकीचा वेग वाढण्यासाठी महत्त्वाच्या रस्त्यांचे पुन्हा रुंदीकरण प्रस्तावित केले होते. त्यावरून, स्थानिक नागरिक आणि व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण होते. रस्ता रुंदीकरणामुळे अनेक घरे आणि दुकाने बाधित होणार होती. त्यामुळे राज्य सरकारकडे हे रुंदीकरण रद्द करण्याची मागणी अनेकांनी केली होती. त्यानुसार, विकास आराखडा मंजूर करताना, रस्त्यांचे रुंदीकरण पूर्णतः रद्द किंवा कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
लक्ष्मी रस्ता २४ मीटर (सुमारे ८० फूट) करण्याचे त्रिसदस्यीय समितीने सुचवले होते. लक्ष्मी रस्त्याच्या दोन्ही बाजूस व्यापारी इमारती असल्याने हे संपूर्ण रुंदीकरणच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर शिवाजी रोड, बाजीराव रोड कुमठेकर रोड यासह इतर प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातील काही रस्ते, १८ मीटरपासून २४ मीटरपर्यंत प्रस्तावित करण्यात आले होते. त्याची रुंदी सध्या आहे तेवढीच ठेवण्यात आली असून, काही ठिकाणी त्यात किरकोळ वाढ सुचविण्यात आली आहे. रस्त्यांचे रुंदीकरण रद्द केल्यामुळे अनेक घरे आणि दुकाने वाचणार आहेत.
शहरातील प्रस्तावित रस्त्यांचे रुंदीकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी हे सर्वच रस्ते आत्ताच वाहतूककोंडीने गजबजलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला चालना देत, खासगी वाहने कमी करण्याचे उपाय महापालिकेला योजावे लागणार आहेत. यातील काही रस्त्यांवरून मेट्रो प्रस्तावित असली, तरी इतर रस्त्यांवरील कोंडी कमी करण्यासाठी कोणते निर्णय घेतले जाणार याकडे लक्ष लागले आहे.