दरोड्याच्या तयारीत असलेले दरोडेखोर गजाआड

26

सामना प्रतिनिधी । जालना

जालना शहरात चोरी, घरफोडीसारख्या गुन्ह्यावर प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारांचा तपास करण्याच्या सूचना दिल्या असतानाच दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला गजाआड करण्यात आले. पोलिसांनी पाठलाग करून या टोळीला गजाआड केले. त्यांच्या ताब्यातून धारदार शस्त्रास्त्रांसह मिरची पावडर जप्त केली.

तलवार, लोखंडी टॉमी, कटर
२३ मार्च रोजी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, पोहेकॉ सचिन चौधरी, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, सदाशिव राठोड, सचिन चौधरी, मदन बहुरे, विष्णू कोरडे असे खासगी वाहनाने जालना शहरात गस्त करीत असतांना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मंठा चौफुली ते अंबड चौफुलीकडे जाणाऱ्या बायपास रोडजवळ कृष्णकुंजनगरच्या बाजूला बँक कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवर संशयास्पद हालचाली करणाऱ्या पाच ते सहा व्यक्ती सहान रस्त्याने जाताना दिसल्या. त्यांचा पाठलाग करून थांबण्यासाठी आवाज दिला असता ते वेगवेगळ्या दिशेने पळू लागले. पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली. त्यामध्ये विजयसिंग कृष्णासिंह भादा, हरदीपसिंग बबलुसिंग टाक, दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक, (रा. गुरुगोविंदसिंगनगर, सिकलकरी मोहल्ला, जालना) अशी आरोपींची नावे आहेत.

हे गुन्हेगार रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या ताब्यात धारदार तलवार, लोखंडी टॅमी, लोखंडी मोठे कटर, नॉयलानची दोरी, मिरची पावडर असे साहित्य मिळून आले. वरील तिन्ही गुन्हेगार रेकॉर्ड वरील असून, त्यांनी यापूर्वी जालना जिल्ह्यात व इतर जिल्ह्यांत गुन्हे केलेले आहे. त्यांच्या विरुध्द पोलीस ठाणे सदर बाजार येथे फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यास पथकाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या