डहाणू – चोरी केल्यावर तो रोवायचा पाकिस्तानी झेंडा,चोरट्याला अटक

चोरी केल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी चोरटे कोणती शक्कल लढवतील हे काही सांगता येत नाही. हात साफ करून पसार होताना चोराने घरामध्ये पाकिस्तानी झेंडा लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्याने त्याची स्पष्ट कबुली दिली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. गौरव दळवी असे या 20 वर्षीय चोराचे नाव असून त्याच्या कारनाम्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

गौरव याने डहाणू तालुक्यातील चिंचणी पाटीलपाडा येथे काशिनाथ पाटील यांच्या घरी 29 सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास चोरी केली. पळून जात असताना शीतल पाटील आणि दीपक सावे या दोघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले. याप्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने घटनास्थळी पाहणी केली तेव्हा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, घटनास्थळी ठेवूनच चोरटा पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास व चौकशी केली असता याआधीदेखील या परिसरात अशा प्रकारची घटना घडल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोन दिवस एका संशयित आरोपीवर पाळत ठेवली. त्यानंतर फिल्मी स्टाईलने पाठलाग करत गौरव दळवी याच्या मुसक्या आवळल्या

…. आणि कबुली दिली
या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने अटक केली आहे. पोलिसांचे तपासातून लक्ष विचलित व्हावे, यासाठी तो लुटमार केलेल्या घरात पाकिस्तानचा झेंडा ठेवून जात होता, असे गौरवने चौकशीत सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या