15 कोटी रुपयांचे मोबाईल चोरले, टोळीने अख्खा ट्रकच पळवला

redmi-note-7-pro

चेन्नईहून मुंबईकडे निघालेला एक ट्रक 10 जणांच्या टोळीने अडवून लुटला. या ट्रकमधून नवे कोरे मोबाईल फोन नेण्यात येत होते. या मोबाईल फोनची एकत्रित किंमत ही 15 कोटी रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कृष्णगिरी भागामध्ये बुधवारी पहाटे ही घटना घडली. चोरट्यांनी ट्रकच्या ड्रायव्हर आणि क्लिनरला मारहाण करत हात पाय बांधून रस्त्याच्या कडेला फेकून दिलं. या दोघांनी पोलीस चौकशीत सांगितलं की चोरटे आपापसात हिंदीत बोलत होते. या ट्रकमधला सगळा माल चोरट्यांनी आपल्या वाहनांत भरला आणि तिथून ते पळून गेले असं या दोघांनी पोलिसांना सांगितलं आहे.

रेडमी कंपनीचे 14,400 मोबाईल 1,440 बॉक्समध्ये भरून मुंबईकडे रवाना करण्यात आले होते. डीएचएल कंपनीकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. के सतीश कुमार (29 वर्षे) हा ट्रक चालवत होता तर एन.अरूण (24 वर्षे) हा त्याच्यासोबत क्लिनर म्हणून ट्रकवर होता. मंगळवारी संध्याकाळी 3 च्या सुमारास सतीशने ट्रक पूनमळ्ळी इथून काढला आणि मुंबईच्या वाटेला लागला. वेल्लोरजवळ त्याने ट्रक जेवणासाठी थांबवला होता.

रात्री 10.30 वाता सतीश आणि अरुणने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. पहाटे 2 वाजेच्या सुमारास ट्रक मेलूमलाई या डोंगराळ प्रदेशातून जात होता. कृष्णगिरी आणि शूळगिरीदरम्यानच्या या टापूमधून चेन्नई-बंगळुरू रस्ता जातो. या रस्त्याने जात असताना एक ट्रक आडवा आला. त्यातून 6 जण उतरले आणि त्यांनी सतीश आणि अरूणला मारहाण करायला सुरुवात केली. नंतर त्यांनी या दोघांचे हातपाय बांधले आणि डोळ्यावर पट्टी बांधली.

चोरट्यांनी सतीश आणि अरुणला ट्रकमध्ये कोंबले आणि ट्रक चालवायला सुरुवात केली. काही अंतरावर या साथीदारांचा दुसरा ट्रक आला आणि तिथे त्यांनी सतीश आणि अरुणला रस्त्यावर फेकून दिलं. तिथून या चोरट्यांनी ट्रकसह पळ काढला. जिथे सतीश आणि अरुणला फेकून दिलं होतं तिथपासून 8 किलोमीटर अंतरावर डीएचएल कंपनीचा ट्रक पोलिसांना सापडला आहे.

रस्त्यावर फेकून दिल्यानंतर अरूण आणि सतीशने कसेबसे आपले हातपाय सोडवलं आणि रस्त्याने जाणाऱ्या 108 नंबरच्या रुग्णवाहिकेला थांबवलं. त्यांनी घडलेला सगळा प्रकार रुग्णवाहिकेच्या चालकाला सांगितला. त्याने या दोघांना कृष्णगिरीतील सरकारी रुग्णालयात आणून सोडलं. त्याने सतीशला पोलिसांशी संपर्क साधण्यासाठीही मदत केली. पोलीस रुग्णालयात आल्यानंतर सतीश आणि अरुण या दोघांनी पोलिसांना सांगितलं की चोरट्यांनी त्यांचे चेहरे झाकलेले नव्हते, आणि ते सगळे इतर राज्यातले असल्याचं स्पष्टपणे कळत होतं. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी 17 पथके तैनात केली आहे. आरोपींनी कोणताही सुगावा सोडला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस आता आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही दृश्ये ताब्यात घेत असून ती तपासत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या