पावसाने झोडले, चोराने लुबाडले; दीड लाखाच्या कांद्याची बागलाणमध्ये चोरी

2973
onion-5

अवकाळी पावसाने झोडपल्याने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱयांना आता कांदा चोरीच्या समस्येने ग्रासले आहे. पावसामुळे हातचे कांदा पीक नासले. त्यामुळे साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळू लागला. मात्र याचा विपरीत परिणाम होऊन चाळीतील उन्हाळ कांदाच चोरीस जाऊ लागला आहे. बागलाण तालुक्यातील अंतापूर रावेर शिवारात दीड लाखांचा कांदा चोरीस गेल्याची घटना घडली. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी शेतकऱयांची अवस्था झाली आहे.

अंतापूर (ता. बागलाण) रावेर शिवारात ता. 3 रोजी रात्री मुस्ताक(पापा) इसाक शेख यांच्या कांद्याच्या चाळीतून साधारण 1 लाख 30 हजार रुपये किमतीचा कांदा चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यामध्ये चोरीबाबत तक्रार दाखल झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

ताहाराबाद- अंतापूर रस्त्यावरील रावेर शिवारातील गट नंबर 23 मधील रस्त्यालगत मुस्ताक शेख यांची कांद्याची चाळ आहे. रविवारी रात्री अज्ञात चोरटय़ांनी वाहन आणून सोबत आणलेला भत्ता कांद्याबरोबर खाऊन 62 कांदा गोणी पैकी चाळीस गोणी आणलेल्या वाहनात टाकून पोबारा केला आहे. ता. 4 रोजी सकाळी लुकमान शेख शेतात आल्यानंतर त्यांना लोखंडी गेटचे साखळी, कुलूप तोडलेली दिसले.त्यावेळी त्यांच्या लक्षात आले असता त्यांनी जायखेडा पोलीस स्टेशनची संपर्क साधून साहेब पोलीस निरीक्षक पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. एम. पवार यांनी मोहन महाजन, लुकमान शेख, अदनान शेख, भगवान माळी यांच्या समक्ष पंचनामा केला. याअगोदर अंतापूर-मुल्हेर रस्त्यावरील आनंदा लाला गवळी यांच्या गट नंबर 347 मध्ये उभे असलेल्या दोन ट्रक्टरच्या बॅटरी, संजय पानपाटील यांच्या वीस शेळ्या, साहेबराव साताळे यांची एक मोटरसायकलसह अनेक शेती उपयोगी साहित्य, उत्पादने चोरी जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान व रात्री पहाटे होणाऱया चोऱया यामुळे दुष्काळात तेरावा महिना उभा राहिला आहे.

पोलिसांची गस्त वाढवा

जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत मोसम-करंजाडी खोऱयातील 92 गाव आहेत. पोलीस संख्याबळ कमी असल्याने अशा लहान-मोठय़ा गुह्यांचे व चोऱयांचे प्रमाण वाढले आहे . शासनाने अधिक पोलीस बळ व गस्त वाढऊन आतापर्यंत झालेल्या चोऱयांचा तपास लावून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अंतापूर येथील माजी उपसरपंच साहेबराव गवळी यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या