कमाल आहे! न्यायालयात चोरी झाली

36

सामना ऑनलाईन,अंबाजोगाई

अंबाजोगाईमधील जिल्हा व सत्र न्यायलयातील स्ट्राँग रूम अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास फोडली. चोरट्यांनी थेट न्यायालयात चोरी करण्याची हिम्मत केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयातील स्ट्राँग रूममधे तीन न्यायालयातील मुद्देमाल ठेवलेला असतो. बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी न्यायालय अधीक्षक कार्यालयाच्या खिडकीचे दोन गज कापून आत प्रवेश केला आणि स्ट्राँग रूमचे फोडून आतला मुद्देमाल लंपास केला.

न्यायालयाच्या स्ट्राँग रूममध्ये रोख रक्कम आणि ठेवींच्या पावत्या असल्याचे समजते. अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालय उघडल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती कळताच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरिक्षक सोमनाथ गिते यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. न्यायालयातून किती मुद्देमाल चोरीला गेलाय हे अजून कळू शकलेलं नाही. चोर न्यायालयात घुसून चोरी करू शकतात यावरून आम्ही किती सुरक्षित आहोत याचा तुम्ही अंदाज लावू शकता अशी खोचक प्रतिक्रिया अंबाजोगाईतील रहिवाशांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या