दगड आणि खेळ

118

रंगीबेरंगी दगड, आदिवासी चित्रकला, काही नामशेष झालेले खेळ आणि अजून बरंच काही मुंबई विद्यापीठात मुलांना अनुभवता येणार आहे.

देश-विदेशातील प्राचीन शस्त्रास्त्र, पुरातन अवशेष, उत्खनन, जीवाश्म, दगडी दफनपद्धतींची उभारणी, आदिवासी चित्रकला, ब्राह्मी-खरोष्टी अक्षरओळख असा वैविध्यपूर्ण इतिहास मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. निमित्त आहे ते मुंबई विद्यापीठात भरवण्यात येणाऱया ‘दी रॉक्स, मिनेरल्स आणि फॉसिल्स’ या प्रदर्शनाचे. यंदा विस्मरणात गेलेले खेळ या प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे. प्रदर्शनात अनेक कालखंडांतील विविध प्रकारची दुर्मिळ नाणीही पाहायला मिळणार आहेत.

मुंबई विद्यापीठाचा बहिःशाल शिक्षण विभाग, इन्स्टुसेन ट्रस्ट, एम. एफ. मक्की आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनातील निवडक वस्तू सोडल्या तर बाकीच्या वस्तू हाताळून पाहता येतात. तसेच भू-शास्त्र आणि पुरातन शास्त्र या दोन्ही कोर्सेसचे विद्यार्थीही तिथे उपस्थित राहून या सगळ्याची माहिती देत असतात. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात संग्रही असलेले जीवाश्म या प्रदर्शनामध्ये असतात. याही वर्षी डायनॉसोरची अंडी, प्राण्यांचे मणके, हाडे, हत्तीचा मोठा सुळा अशा कधीच न पाहिलेल्या गोष्टी अनुभवता येणार आहेत. जीवाश्म म्हणजे काय हे केवळ आपण पुस्तकातच वाचले होते. ते प्रत्यक्ष पाहायला मिळणं ही विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असेल, असे बहिशःला विभागाच्या संचालिका मुग्धा कर्णिक यांनी सांगितले.

एमएमआरडीएला खोदकाम करताना ३२ मीटर खाली सापडलेले बेसॉल्ट खडक, विविध प्रकारचे दगड या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या पोटात काय आहे तेही विद्यार्थ्यांना पाहता येईल. मुंबईच्या विविध भागांत मिळालेली खनिजे प्रदर्शनात ठेवणार आहोत. दोन वर्षापासून मुंबई-साष्टी बेटाचे जे आम्ही काम केले, पुरातत्त्व शास्त्राचा सर्व्हे केला त्यावेळी सापडलेल्या वस्तू प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. या शोधकार्यात एक शिलालेख सापडला होता. तोही या प्रदर्शनात असणार आहे. तसेच मोडी लिपी, ब्राह्मी लिपी, खरोष्टी त्यातील तीन-चार लिपी लिहून दाखवण्यात येतील. याबरोबरच पुरातत्व शास्त्राचा अभ्यास कसा केला जातो ते खोदून काढायचे कसे, रेकॉर्ड कसे करायचे याची माहिती आणि प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. त्यासाठी एक खड्डा खणून त्यात मणी, मडक्याचे तुकडे अशा काही गोष्टी लपवून ठेवतो आणि ते कसे शोधायचे याचे तंत्र शिकवले जाते. तसेच विविध प्रकारच्या ‘बरियल साइटस्’ किंवा दगडी दफनपद्धतींची उभारणी केलेलीही पाहायला मिळेल असेही मुग्धा कर्णिक म्हणाल्या.

‘दी रॉक्स, मिनेरलव्स आणि फॉसिल्स’ प्रदर्शन
मुंबई विद्यापीठाता बहिःशाल शिक्षण विभाग, इन्स्टुसेन ट्रस्ट, एम.एफ.मक्की आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाच्या सहकार्याने ‘दी रॉक्स, मिनेरलव्स आणि फॉसिल्स’ या विषयांवर हे प्रदर्शन १४ ते १७ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन विनामूल्य आहे.

यंदाचे आकर्षण…
आज काळ बदलला आणि पूर्वीचे बैठे, मैदानी खेळ मुलांच्या विस्मरणात गेले. हे खेळ मुलांना समजावेत, मुलांनी त्या खेळांचा आनंद घ्यावा यासाठी यंदा विस्मरणात गेलेले खेळ हे प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे. यामध्ये गोट्या, लगोऱ्या, सागरगोटा, विटीदांडू असे विस्मरणात गेलेले खेळ असणार आहेत. त्याची प्रात्यशिके दाखवली जाणार असून ते खेळायलाही देणार आहोत. तसेच हे खेळ कसे खेळायचे, त्याचे नियम अशी आम्ही एक पुस्तिका तयार करतोय प्रदर्शनाच्या वेळीच त्याचे प्रकाशन करू असे बहिःशाल विभागाच्या संचालिका मुग्धा कर्णिक यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या