फेडररने पाच वर्षांनंतर जिंकले ग्रॅण्डस्लॅम

50

मेलबर्न – स्वित्झर्लंडचा सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडररने आपला चिरप्रतिस्पर्धी असलेल्या स्पेनच्या राफेल नदालचा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. फेडररने पाच सेटपर्यंत रंगलेल्या जेतेपदाच्या लढतीत नदालवर ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ असा विजय मिळवित चाहत्यांना ‘ड्रीम फायनल’चा थरार दाखविला. ३५ वर्षीय फेडररचे कारकिर्दीतील हे १८वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद होय. तसेच तब्बल पाच वर्षांनंतर रॉजर फेडररने ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा पराक्रम करून दाखवलाय.

अनेक रथी-महारथी टेनिसपटूंच्या धक्कादायक पराभवानंतर १७व्या मानांकित रॉजर फेडरर व ९व्या मानांकित राफेल नदाल या समकालीन महान टेनिसपटूंमधील ‘ड्रीम फायनल’ने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनची सांगता झाली. उभय खेळाडूंच्या तोडीस तोड खेळामुळे टेनिसशौकिनांसाठी ही किताबी लढत आनंदाची पर्वणीच ठरली. फेडररने गुरूवारी स्टॅन वावरिंकाचा पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव करून अंतिम फेरी गाठली होती, तर शुक्रवारी बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमीत्रोवने नदालला विजयासाठी पाच सेटपर्यंत झुंजविले होते. नोवाक जोकोविच व ऍण्डी मरे या अव्वल मानांकित खेळाडूंचा आधीच पराभव झाल्याने तमाम टेनिसप्रेमींना फेडरर-नदाल यांच्यातील फायनलचे वेध लागले होते. अखेर रविवारी झालेल्या ‘ड्रीम फायनल’मध्ये उभय खेळाडूंनी ताकदवर फोरहॅण्ड, भन्नाट बॅकहॅण्ड आणि जबरदस्त बिनतोड सर्व्हिस असे आक्रमक टेनिस खेळून उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

फेडररने नदालचे सर्व्हिस ब्रेक करून पहिला सेट जिंकला. त्यानंतर नदालने दुसरा सेट जिंकून लढत काटय़ाची होणार असल्याचे संकेत दिले. फेडररने तिसऱया सेटमध्ये अतिशय देखणा खेळ करीत नदालला चूका करण्यास भाग पाडले. मग फेडररने हा सेट ६-१ फरकाने जिंकून लढतीत २-१ अशी आघाडी घेतली. मात्र, नदालने चौथा सेट जिंकून सामन्यात पुन्हा रंगत निर्माण केली. उभय खेळाडूंच्या चाहत्यांचे श्वास रोखले गेले होते. पाचव्या व निर्णायक सेटमध्ये नदालने सुरूवातीला आघाडी घेतली. मात्र, फेडररने नंतर ४-३ अशी आघाडी घेतली. मग फेडररने अतिशय शांतपणे खेळ करीत विजयाला गवसणी घातली.
झोकात पुनरागमन

२०१२ सालामध्ये विम्बल्डन जिंकणाऱया स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर या दिग्गज खेळाडूने तब्बल पाच वर्षानंतर ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा मान संपादन केलाय हे विशेष. रॉजर फेडररने पुरुष एकेरीत १८वे ग्रॅण्डस्लॅम जिंकत टेनिसविश्वात झोकात पुनरागमन केले. २०१० सालानंतर त्याला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकता आले आहे. हे त्याचे पाचवे ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद ठरले. २००७ सालानंतर ग्रॅण्डस्लॅममध्ये राफेल नदालला हरवणाऱया रॉजर फेडररने तब्बल तीन वेळा प्रतिस्पर्ध्यांना पाच सेटमध्ये हरवत ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याची करामत करुन दाखवलीय. दुखापत व सुमार फॉर्म यामध्ये अडकलेल्या दोन्ही खेळाडूंसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची होती. या स्पर्धेत जबरदस्त खेळ करीत दोघांनी झोकात पुनरागमन केले.

सानिया मिर्झाला उपविजेतेपद

स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा व इवान डोडिग या जोडीला ऑस्ट्रेलियन ओपनमधील मिश्रच्या दुहेरीत उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. ऑबिगेल स्पीयर्स व यॉन सॅबेस्टीयन यांच्याकडून त्या जोडीला हार सहन करावी लागली.

आपली प्रतिक्रिया द्या