शासनाच्या बारव संवर्धन समितीतून रोहन काळे बाहेर, नवी स्वतंत्र समिती स्थापण्याची घोषणा

>> विशाल अहिरराव

जलसंवर्धनाचा पारंपरिक स्रोत असलेल्या बारवांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने गेल्या आठवडय़ात बारव संवर्धन समितीची स्थापना केली. यात 22 जणांचा समावेश होता. महाराष्ट्रातील ‘बारव’ प्रकाशझोतात आणण्यात आणि बारवांच्या संदर्भात जनजागृती करणाऱ्या रोहन काळे यांचादेखील या समितीत समावेश होता. मात्र, रोहन काळे यांनी पहिल्याच दिवशी समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे समितीच्या पुढील वाटचालीसंदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाच्या बारव संवर्धन समितीत या मोहिमेशी काही संबंध नसलेल्या आणि बारवसंदर्भात अभ्यास नसणाऱ्या काही व्यक्तींचा समावेश करण्यात आल्याची कुजबुज होती. त्यामुळे ही समिती कशी काय काम करणार, असे प्रश्न चर्चिले जात होते. अशातच ज्यांनी महाराष्ट्र बारव मोहीम राबवून महाराष्ट्रातील बारव, त्यांची रचना, त्यांची उपयुक्तता, त्यांच्या निर्मितीचा कालखंड आणि भव्यता जगासमोर आणली अशा रोहन काळे यांनी पहिल्याच दिवशी समितीतून माघार घेतली. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून नवी आणि स्वतंत्र ‘महाराष्ट्र बारव मोहीम समिती’ स्थापन करत असल्याची घोषणा केली.

रचनात्मक काम करणार

शासकीय समिती आवश्यक असून त्यातून आमच्या उद्देशाला एकप्रकारचे बळ मिळेल असेही ते म्हणाले. मात्र केवळ शासकीय समितीच्या कामाने बारव पुनरुज्जीवन होणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. समिती गाळ काढेल, बारव स्वच्छ करेल पण यातून लोकांची मानसिकता बदलणार का? जोपर्यंत याबाबत जनजागृती होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बारव पुनरुज्जीवन झाले असे म्हणता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. आमची समिती ही गैरशासकीय समिती असणार आहे. आम्ही सरकारी समितीच्या कामात हस्तक्षेप करणार नाही किंवा नकारात्मक काम करणार नाही. आमची समिती रचनात्मक काम करून स्टेपवेल मॅपिंग, डॉक्युमेंटेशन, स्वच्छता मोहीम, हेरिटेज टूर्स, दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर काम करून लोकांमध्ये बारव टिकवण्यासाठी जागृती आणेल. यासाठी राज्यातील आर्किटेक्चर कॉलेजचीदेखील मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.