रोहिणी मोहिते आणि अपूर्वा पाटील यांची हिंदुस्थानी संघात निवड

73

सामना ऑनलाईन । पुणे

मकाऊ येथे २० जुलैपासून आयोजित करण्यात आलेल्या आशिया कप कॅडेट आणि ज्युनियर्स आंतरराष्ट्रीय ज्युडो स्पर्धांसाठी ४० किलोखालील गटामध्ये राज्य शासनाच्या प्रबोधिनीची खेळाडू रोहिणी मोहितेची, तर ७० किलोखालील गटामध्ये ठाण्याच्या अपूर्वा पाटीलची निवड झाली आहे. याच स्पर्धेसाठी महाराष्ट्र ज्युडो संघटनेचे सचिव आणि आंतरराष्ट्रीय पंच दत्ता आफळे यांची रेफरी म्हणून नेमणूक झालेली असल्याचे हिंदुस्थानी ज्युडो महासंघाने कळविले आहे. मकाऊ येथील स्पर्धेमध्ये जपान, चीन, कोरिया यासह सर्व प्रमुख आशियाई देश सहभागी होणार आहेत.

सातारा येथील रहिवासी असलेल्या रोहिणीने याच वर्षी झालेल्या लेबनॉन येथील स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. रोहिणी मोहिते ही राज्य शासनाच्या प्रबोधिनीची खेळाडू आहे. तिने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले असून एका आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदकाची तिच्या खात्यात नोंद आहे. अमरावतीच्या डॉ. सतीश पहाडे यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेली रोहिणी सध्या पुणे प्रबोधिनीमध्ये मधुश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ठाण्याच्या अपूर्वाने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके पटकावली असून ती देवीसिंह राजपूत यांची खेळाडू आहे. या दोघींकडून मकाऊ येथील स्पर्धेमध्ये पदकांची अपेक्षा आहे. महाराष्ट्र ज्युडो संघटनेचे जनरल सेक्रेटरी आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या लोकमंगल या पुणे मुख्यालयी मीडिया मॅनेजर पदावर कार्यरत आणि आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण दत्ता आफळे यांची या स्पर्धेसाठी पंच म्हणून नेमणूक झाली आहे. आफळे यापूर्वी हिंदुस्थानी ज्युडो कुमार संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमले गेले होते. त्यांना परदेशातील चार, तर देशांतर्गत स्पर्धांचा अनुभव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या