द्विशतकांचा ‘बादशहा’ रोहितचा पराक्रम; एकाच डावात तेंडुलकर-गांगुलीचा विक्रम मोडला

54317

एक दिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतक ठोकण्याचा पराक्रम करणारा टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक लढतीत रोहित शर्मा याने एक दिवसीय क्रिकेटमधील 9 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथी धाव घेताच रोहितने हा पराक्रम केला. यासह एकाच डावात रोहितने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि ब्रायन लारा यांचा विक्रम मोडला.

रोहितने 217 व्या डावात नऊ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये नऊ हजार धावा पार करण्यासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने 228 डाव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 235 डाव आणि वेस्ट इंडीजचा महान खेळाडू ब्रायन लारा याने 239 डाव घेतले होते.

एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान 9 हजार धावा करण्याचा विक्रम टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने 194 डावांमध्ये हा पल्ला गाठत विश्वविक्रम केला. विराटनंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हीलिअर्स याचा नंबर लागतो. डीव्हीलिअर्सने 205 डावांमध्ये 9 हजार धावा केल्या होत्या. विराट आणि डीव्हीलिअर्सनंतर आता रोहित शर्मा याचा तिसरा नंबर लागला आहे.

दमदार कामगिरी सुरू
2019 या वर्षात रोहित शर्मा याने दमदार कामगिरीची नोंद केली होती. रोहितने 28 लढतीत 1409 धावांचा पाऊस पाडला होता. यात त्याच्या सात शतकांचा समावेश होता. 2019 चा हा फॉर्म रोहित 2020 मध्ये पुढे सुरू ठेवण्याच्या तयारीत आहे.

वन डेमध्ये वेगवान 9 हजार धावा ठोकणारे खेळाडू –

विराट कोहली (हिंदुस्थान) – 194 डाव
एबी डीव्हीलिअर्स (दक्षिण आफ्रिका) – 205 डाव
रोहित शर्मा (हिंदुस्थान) – 217 डाव
सौरव गांगुली (हिंदुस्थान) – 228 डाव
सचिन तेंडुलकर (हिंदुस्थान) – 235 डाव
ब्रायन लारा (वेस्ट इंडीज) – 239 डाव

आपली प्रतिक्रिया द्या