रोहितचा बेजबाबदार फटका,सुनील गावसकरांनी केली टीका

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेरीस हिंदुस्थानचा संघ 307 धावांनी पिछाडीवर आहे. टीम इंडियाचे आठ फलंदाज अद्याप बाकी आहेत. मात्र यापेक्षा चांगल्या स्थितीत पाहुणा संघ असू शकला असता. पण रोहित शर्माच्या बेजबाबदार फटक्यामुळे टीम इंडियाचा संघ दुसऱ्या दिवसअखेरीस बॅकफूटवर फेकला गेला आहे. हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी रोहित शर्माच्या या फटक्यावर टीका करताना म्हटले की, नॅथन लायनच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने एक चौकार मारला असताना त्याच षटकात दुसरा आक्रमक फटका खेळण्याची गरज नव्हती. रोहित शर्मा बेजबाबदार फटका खेळून बाद झाला.

फटका खेळल्याचा पश्चात्ताप नाही – रोहित

सुनील गावसकरांनी रोहित शर्माची कानउघाडणी केली असली तरी दस्तुरखुद्द रोहित शर्माला तो फटका खेळल्याचे कोणतेही दुःख झालेले नाही. यावेळी तो म्हणाला, मला गोलंदाजांवर दबाव टाकायला आवडते. माझा संघातील हाच रोल आहे. त्यामुळे नॅथन लायनच्या गोलंदाजीवर तो फटका खेळल्याचे मला कोणतेही दुःख झालेले नाही किंवा पश्चात्ताप झालेला नाही.

माफी नाही; कांगारूंना विकेट गिफ्टच्या रूपात दिली

सुनील गावसकर रोहित शर्माच्या त्या फटक्यावर जाम भडकले. पुढे ते म्हणाले, रोहित शर्मा हा हिंदुस्थानी संघातील सीनियर खेळाडू आहे. टीम इंडियातील रोल काय आहे हे त्याला माहीत असायला हवे. ब्रिस्बेनमध्ये कसोटी सुरू आहे. त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. याचे रूपांतर मोठय़ा खेळीत करायला हवे होते, पण त्याने आपली विकेट कांगारूंना गिफ्टच्या रूपात देऊन टाकली. त्याच्या या फटक्याला माफी नाही, असेही ते पुढे परखडपणे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या