रोहित शर्मा कटकच्या एकदिवसीय सामन्यात विराटचा ‘हा’ विक्रम मोडणार?

2859

टीम इंडियाचा एकदिवसीय सामन्यातील उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कटकमध्ये रविवारी वेस्टइंडिजविरोधात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा विराट कोहलीचा एक विक्रम मोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारच्या निर्णायक एकदिवसीय सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. हा विक्रम मोडण्यासाठी रोहितला फक्त 34 धावांची गरज आहे.

कटकच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने 34 धावा झळकवल्यावर विराट कोहलीचा 2017 या वर्षात एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा केल्याचा विक्रम मोडीत निघणार आहे. विराट कोहलीने 2017 मध्ये 6 शतके आणि 7 अर्धशतके झळकावत एकदिवसीय सामन्यात 1460 धावा केल्या होत्या. तर 2019 या वर्षात रोहित शर्माने 7 शतके आणि 5 अर्धशतके झळकावत 1427 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता कटकच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने 34 धावा केल्यावर तो विराटचा विक्रम मोडणार आहे. या वर्षी झालेल्या विश्वचषकात रोहित शर्माने 5 शतके झळकावली होती.

विराट कोहलीने 2019 या वर्षात 1292 धावा केल्या आहेत. या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्मा 1427 धावा करून पहिल्या स्थानावर तर वेस्टइंडिजचा शाई होप 1303 धावा करून दुसऱ्या स्थानावर आहे. एकदिवसीय सामन्यात एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. 1998 मध्ये सचिन तेंडूलकरने एकदिवसीय सामन्यांमध्ये 9 शतके आणि 7 अर्धशतके झळकावत 1894 धावा केल्या होत्या. सचिनचा हा विक्रम आतापर्यंत कोणताही फलंदाज मोडू शकलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या