टी-20 च्या वादळी खेळाचा मी तब्बल 17 वर्षे मनमुराद आनंद लुटलाय. जेव्हा मी टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली तेव्हा ठरवलं की आता नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळावी म्हणून आपण थांबायला हवं. हीच योग्य वेळ होती. आपल्या हिंदुस्थानात अनेक चांगले खेळाडू जोरदार कामगिरी करत होतो. त्यामुळे मला वाटलं, टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे आणि मी ती जाहीर केल्याची भावना रोहित शर्माने एका ‘यूटय़ूब’ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. जितेंद्र चोक्सी या ‘युटय़ूबर’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित भरभरून बोलला. तो म्हणाला, मी गेली 28-29 वर्षे फक्त क्रिकेट खेळतोय. आम्ही तेव्हा सोसायटीत खेळत होतो. मुंबई खेळण्यासाठी जागेची नेहमीच कमतरता असायची. जेथे मिळेल, तेथे आम्ही हातात बॅट घेऊन खेळायचो. तेच आमचे मैदान असायचे. मी माझ्या मित्रांसोबत, कधी शाळेतल्या मित्रांसोबत खेळलो. बिल्डिंगमधल्या मित्रांसोबत केवळ मजेसाठी खेळायचो. तेव्हा मला जराही कल्पना नव्हती की मी क्रिकेटपटू म्हणून इथपर्यंत पोहोचेन. क्रिकेटमध्ये करिअर करणे सोप्पे नव्हते. याचा माझ्या अभ्यासावरही परिणाम झाला. बराच प्रवासही करावा लागला. त्यामुळे मी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा कणखर बनलो.