हिंदुस्थान आणि न्युझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत हिटमॅन रोहित शर्माला वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडित काढण्याची संधी आहे. वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडित काढला तर, रोहित शर्मा असा पराक्रम करणारा पहिला फलंदाज ठरेल.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या धमाकेदार फलंदाजीच्या शैलीमुळे हिटमॅटन म्हणून प्रचलीत आहे. न्युझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहितने 5 षटकार ठोकले तर षटकारांचा बादशहा हे बिरूद मिरवण्याची नामी संधी त्याला असणार आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये 87 षटकार ठोकले आहेत. मात्र हिंदुस्थानकडून खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. वीरेंद्र सेहवागने 104 कसोटी सामन्यांमध्ये 91 षटकार ठोकले आहेत. या क्रमवारीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. जर न्युझीलंडविरुद्धच्या मालिकेत रोहितने पाच षटकार ठोकले, तर टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल.
कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वीरेंद्र सेहवाग 91 षटकार ठोकत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा (87 षटकार), तिसऱ्या क्रमांकावर महेंद्र सिंग धोनी 78 षटकार, चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडूलकर 69 षटकार आणि पाचव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा 66 षटकार यांचा समावेश आहे. रोहित शर्मा वन डे आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे.