रोहितची ‘रेकॉर्ड’ब्रेक कामगिरी; ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड मोडला

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानचा स्फोटक खेळाडू रोहित शर्मासाठी श्रीलंकेविरुद्धची मालिका खास ठरली आहे. एकदिवसीय सामन्यात तिसरं दुहेरी शतक त्यानतंर टी-२० सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम या मालिकेत रोहितने केला आहे. आता आणखी एक विक्रम रोहित शर्माने त्याच्या नावावर केला आहे. एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितने केला आहे.

मुंबईत झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात रोहीतने २० चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीनं २७ धावा केल्या. या षटकाराच्या मदतीनं रोहितीनं वेस्ट इंडिजचा आक्रमक खेळाडू ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने यावर्षी एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० सामन्यांमध्ये एकूण ६५ षटकार ठोकले. तर ख्रिस गेलने याआधी एका वर्षात ६४ षटकार ठोकले होते.

याशिवाय रोहित शर्माने २०१७ या वर्षामध्ये श्रीलंकेविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये ३८ षटकार ठोकले. त्याने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचाही विक्रम मोडित काढला. गेलने २०१२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये एका वर्षात 33 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा अनोखा विक्रम रोहितने केला आहे.