बांगलादेशला रो’हीट’ वादळाचा तडाखा,दुसरी टी-20 जिंकून टीम इंडियाची मालिकेत बरोबरी

चक्रीवादळाचे सावट असलेल्या राजकोटमधील दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात चक्रीवादळ तर आले नाही, पण कर्णधार रोहित शर्माच्या वादळाचा बांगलादेशला तडाखा बसला. ‘टीम इंडिया’ने ‘जिंका किंवा मरा’च्या लढतीत पाहुण्यांचा 8 गडी व 26 चेंडू राखून धुव्वा उडविला. या विजयासह हिंदुस्थानने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधत आव्हान राखले. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रोहितने 43 चेंडूंत 85 धावांची वादळी खेळी करताना 6 चौकारांसह तितकेच षटकारही ठोकले.

सरकार-महमुदुल्लाह जोडीची उपयुक्त फलंदाजी

पहिल्या सामन्यातील सामनावीर ठरलेल्या मुश्फिकुर रहिमला (4) यावेळी चहलने स्थिरावण्यापूर्वीच पांडय़ाकरवी झेलबाद केले. मात्र, सौम्या सरकार (30)  व कर्णधार महमुदुल्लाह (30) यांनी उपयुक्त फलंदाजी केल्याने बांगलादेशला दीडशेचा टप्पा ओलांडता आला. चहलने सरकारला चकवले अन् पंतने त्याला यष्टीचित केले. अफिफ हुसैनला (6) खलील अहमदने रोहितकरवी झेलबाद केल्यानंतर दीपक चहरने महमुदुल्लाहला दुबेकरवी झेलबाद करून बांगलादेशच्या फलंदाजीतील हवा काढून घेतली.

दासला दोनदा जीवदान

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 6 बाद 153 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. लिटन दास (29) व मोहम्मद नईम (36) यांनी 60 धावांची सलामी देत बांगलादेशला खणखणीत सुरुवात करून दिली. दरम्यान लिटन दासला हिंदुस्थानने दोनदा जीवदान दिले. युझवेंद्र चहलच्या सहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर यष्टीरक्षक रिषभ पंतने दासला यष्टीचित केले. पंचांनी त्याला बाद दिले, पण तिसऱ्या पंचांनी पंतची चूक पकडली. पंतने यष्टीच्या पुढे चेंडू पकडून यष्टीचित केल्याचे रिप्लेमध्ये दिसल्याने तो नो बॉल ठरवून दासला नाबाद ठरविण्यात आले.

रोहित शर्मा कपिल, गावसकरांच्या पंक्तीत

राजकोटमधील टी-20 सामन्यात उतरताच रोहित शर्माने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला. शंभर आंतराष्ट्रीयटी-20 सामने खेळणारा तो हिंदुस्थानचा पहिला क्रिकेटपटू ठरला. क्रिकेटविश्वात अशी उपलब्धी मिळविणारा तो दुसरा क्रिकेटपटू होय. पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर 111 सामने जमा आहेत. वन डे क्रिकेटमध्ये सर्वप्रथम शंभर सामने खेळण्याचा मान कपिल देव यांनी, तर कसोटी क्रिकेटमध्ये हा मान सुनील गावसकर यांनी मिळविला.टी-20मध्ये सर्वप्रथम शंभर सामने खेळून रोहित शर्माही कपिल देव व सुनील गावसकर या महान खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला.

रोहित-शिखरची शतकी भागीदारी

बांगलादेशकडून मिळालेले 154 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 15.3 षटकांत 2 बाद 154 धावा करून पूर्ण केले. रोहित शर्माने टॉप गीअरमध्ये फलंदाजी करताना सामना एकतर्फी केला. त्याने शिखर धवनच्या (31) साथीने 10.5 षटकांत 118 धावांची सलामी देत हिंदुस्थानला धडाकेबाज सुरुवात करून दिली. 27 चेंडूंत 4 चौकारांसह 31 धावा करणाऱ्या धवनचा इमिनूल इस्लामने त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. शतकाच्या दिशेने कूच करणाऱ्या रोहितने हाणामारीच्या नादात बदली खेळाडू मोहम्मद मिथुनकडे झेल दिला.  त्याआधी, त्याने मोसाद्देक हुसैनला सलग तीन षटकार ठोकून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने (नाबाद 23) लोकेश राहुलच्या (नाबाद 8) साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले. श्रेयसने 12 चेंडूंत 3 चौकार व एक षटकार ठोकून रोहितची उणीव भासू दिली नाही.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या