फलंदाजीतील दादा इथंही ‘हिट’, रोहित शर्माने 53 वर्ष अबाधित असलेला विक्रम मोडला

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये निर्णायक कसोटी सामना सुरू आहे. टीम इंडियापुढे 328 धावांचे आव्हान असून चौथ्या दिवसाखेर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या संघाने बिनबाद 4 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी टीम इंडियाने यजमान संघाचा दुसरा डाव 294 धावांवर रोखला. मोहम्मद सिराजने 5 बळी घेतले, तर शार्दुल ठाकूरने चार फलंदाजांना पवेलियनचा रस्ता दाखवला. एक बळी वाशिंग्टन सुंदरला मिळाला.

चौथ्या दिवशी मोहम्मद सिराजसह रोहित शर्माने देखील एक ‘पंच’ लगावला. फलंदाजीत दादा असणाऱ्या रोहितने क्षेत्ररक्षणातही आपण ‘हिट’ असल्याचे दाखवून देत ब्रिस्बेन कसोटीत तब्बल 5 झेल घेतले आणि 53 वर्षे अबाधित असणारा एक विक्रम आपल्या नावे केला. ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाकडून एका कसोटीत सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आता रोहितच्या नावावर जमा झाला आहे.

रोहित शर्माने पहिल्या डावात सिराजच्या गोलंदाजीवर वॉर्नर (1), सुंदरच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ (36) आणि ठाकूरच्या गोलंदाजीवर टीम पेन (50) याचा झेल घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात सिराजच्या गोलंदाजीवर पहिला झेल लाबुशेन (25) याचा आणि त्यानंतर ठाकूरच्या गोलंदाजीवर ग्रिन (37) याचा झेल घेतले.

याआधी 1968 ला टीम इंडियाच्या रुसी सुरती यांनी 3 झेल घेतले होते. तसेच सुनील गावसकर यांनी 1977 ला आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने 2003 ला ब्रिस्बेनमध्ये 3 झेल घेत त्यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. मात्र 1968 ते 2021 अशी 53 वर्षे रुसी यांचा विक्रम अबाधित होता. आता हा विक्रम रोहितने आपल्या नावे केला आहे.

यांची केली बरोबरी

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीमध्ये 5 झेल घेण्याच्या एकनाथ सोलकर, राहुल द्रविड आणि के. श्रीकांत यांच्या विक्रमाची रोहितने बरोबरी केली. एकनाथ सोलकर यांनी 1969-70 ला आणि राहुल द्रविडने 1997-98 ला चेन्नई कसोटीत, तर के. श्रीकांत यांनी 1991-92 ला पर्थ कसोटीत अशी कामगिरी केली होती.

पाचवा दिवस महत्त्वाचा

दरम्यान, पाचव्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 324 धावांची गरज असणार आहे. ब्रिस्बेनमध्ये आतापर्यंत चौथ्या डावात एकाही संघाला 250 हून अधिक धावांचे आव्हान पार करता आलेला नाही. त्यामुळे सर्वांचे लक्ष उद्याच्या खेळावर असणार आहे. हा सामना अनिर्णित राहिला तरी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियाकडे राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या